उर्दू भाषेच्या विकासासाठी राज्यातील ५ ठिकाणी उर्दू घर निर्मिती अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:06 AM2021-07-01T04:06:21+5:302021-07-01T04:06:21+5:30

नवाब मलिक यांची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात उर्दू भाषेची वाङ्मयीन प्रगती व्हावी, मराठी व उर्दू भाषेतील ...

Construction of Urdu houses at 5 places in the state for the development of Urdu language is in the final stage | उर्दू भाषेच्या विकासासाठी राज्यातील ५ ठिकाणी उर्दू घर निर्मिती अंतिम टप्प्यात

उर्दू भाषेच्या विकासासाठी राज्यातील ५ ठिकाणी उर्दू घर निर्मिती अंतिम टप्प्यात

Next

नवाब मलिक यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात उर्दू भाषेची वाङ्मयीन प्रगती व्हावी, मराठी व उर्दू भाषेतील लेखक, कवी, विचारवंत इत्यादींमध्ये सर्जनशील विचारांची देवाणघेवाण होऊन उर्दू भाषेचा वाङ्मयीन विकास व्हावा यासाठी राज्यात ५ ठिकाणी उर्दू घर निर्मितीचे काम राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत हाती घेण्यात आलेले आहे. ही कामे लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असून, त्यांच्या व्यवस्थापनासंदर्भातही धोरण निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी दिली.

नांदेड येथील उर्दू घरासाठी ८.१६ कोटी रुपये निधी मंजूर असून बांधकाम पूर्ण झाले आहे. लवकरच त्याचे लोकार्पण करण्यात येईल. सोलापूर येथे उर्दू घराचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून त्याकरिता आतापर्यंत ६.८२ कोटी रुपये इतका निधी वितरित केला आहे. मालेगावमधील काम पूर्ण होऊन ते कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरू आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात उर्दू घर बांधणे प्रस्तावित असून याबाबतचा प्रस्ताव मुंबई विद्यापीठाकडून शासनास सादर केला जाणार आहे. नागपूर येथील इस्लामिक कल्चरल सेंटरची इमारत उर्दू घर म्हणून विकसित करण्यात येत आहे. यासाठी ५० लाख रुपये इतके अनुदान वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती मंत्री मलिक यांनी दिली.

कामे लवकरात लवकर पूर्ण करून ती उर्दू भाषेच्या विकासासाठी खुली करण्याच्या दृष्टीने विभागामार्फत कार्यवाही सुरू आहे. या घरांचा वापर, देखभाल, दुरुस्ती तसेच ती सुस्थितीत ठेवण्यासाठी मूळ धोरण शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले होते. आता त्यात काही नवीन मुद्द्यांची भर घालण्यात आली असून, सविस्तर नियमावली जारी करण्यात आली आहे. तसेच या उर्दू घरांमध्ये आयोजित करावयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक समिती तसेच प्राधिकृत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.

.....................................................

Web Title: Construction of Urdu houses at 5 places in the state for the development of Urdu language is in the final stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.