लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहिसर पूर्व येथील प्रभाग क्रमांक ३ व्ही. व्ही. पेडणेकर मार्गावरील समाजकल्याण मंदिर येथे स्थानिक शिवसेना नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्या प्रयत्नाने नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. पालिकेच्या आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल यांच्या हस्ते कोरोना लसीकरण केंद्राचे नुकतेच उद्घाटन झाले.
शिवसेना विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस तसेच मागाठाणेचे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक ३ मधील व्ही. व्ही. पेडणेकर रोडवरील समाजकल्याण मंदिरात लसीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली.
बाळकृष्ण ब्रीद यांच्या प्रभाग क्रमांक ०३ मध्ये दहिसर चेकनाका येथील जम्बो कोविड केंद्राचा भाग येतो. या जम्बो कोविड केंद्रात लसीकरणाची प्रक्रिया सुरू होती; परंतु यात शेकडोंच्या संख्येने नागरिक रांगा लावून उभे असत. यामुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो; तसेच एवढ्या प्रचंड प्रमाणात जनसमुदाय जमल्याने काेरोना विषाणूचे संक्रमण अफाट वेगाने वाढू शकते. हा धोका लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रत्येक प्रभागात वेगळे लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, जेणेकरून नागरिकांना घराजवळ लस घेता येईल आणि केंद्रांवर गर्दीचा धोकासुद्धा टळेल, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक ब्रीद यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री आदित्य ठाकरे, महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे दिले होते.
ही मागणी मान्य करून शुक्रवारी मुंबईतील सर्व प्रभागांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला.
या उद्घाटनप्रसंगी महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, परिमंडळ ७ चे उपायुक्त विश्वास शंकरवार, आर- उत्तर विभागाच्या साहाय्यक आयुक्ता संध्या नांदेडकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश वायदंडे उपस्थित होते.
नागरिकांनीही या लसीकरण केंद्रात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण करून घेतले तसेच ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून सर्व सुविधांनी सज्ज आणि एक आदर्श असे लसीकरण केंद्र आपल्या प्रभागात हे केल्याबद्दल अनेक नागरिकांनी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांचे आभार मानले.
नागरिकांना आगाऊ नोंदणी करूनच लस देण्यात येईल
तसेच नोंदणी करून आलेल्या नागरिकांना रांगेत उभे असताना जास्त त्रास होऊ नये. सोशल डिस्टन्सिंग पाळत उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी पाणी आणि इतर व्यवस्था या केंद्रांवर करण्यात आली आहे.
तसेच लसीकरण झाल्यावर नागरिकांना काही वेळ निरीक्षणाखाली ठेवण्यासाठीदेखील संपूर्ण व्यवस्था नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी केली आहे.
- ------------------------------------