सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची माहिती; स्ट्रक्चरल बदल केल्यामुळेही घडली दुर्घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाडच्या मालवणीमध्ये चार मजली रहिवासी बांधकामाचा भाग कोसळून ११ जणांचा बळी गेला. तौक्ते वादळातच या बांधकामाला तडे गेले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत त्यात स्ट्रक्चरल बदल केल्यामुळे बांधकाम कोसळल्याचे सह आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.
याठिकाणी तीन ते चार कुटुंबे राहण्यास होती. बुधवारी रात्री घराचा काही भाग कोसळताच अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. यात ११ जणांचा बळी गेला असून, सातजणांवर उपचार सुरू आहेत. यात मृतांमध्ये एकाच कुटुंबातील नऊजणांचा समावेश आहे. गुरुवारी सह आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तौक्ते वादळातच बांधकामाला तडे गेले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून त्यात स्ट्रक्चरल बदल केल्यामुळे बांधकाम कोसळले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. तसेच संबंधिताविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवत कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव आजूबाजूच्या काही इमारती रिकाम्या करण्यात येत आहेत.
........................................