बांधकाम ६ टक्क्यांनी महागणार, ‘जेएलएल’च्या अहवालातील माहिती; मुंबईतील घरांच्या किमती वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 09:15 AM2024-04-24T09:15:27+5:302024-04-24T09:17:27+5:30
घरांच्या बांधणीसाठी आवश्यक स्टील, सिमेंट, वाळू, विटा, यांच्या विक्रीदरात वाढ झाली आहे
मुंबई : मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये तेजी आल्यानंतर आता गृहबांधणीच्या किमतींमध्ये किमान ६ टक्क्यांची वाढ होणार असल्याची माहिती जेएलएल या बांधकाम विषयात काम करणाऱ्या कंपनीच्या एका अहवालातून पुढे आली आहे.
घरांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्चा सामानाच्या किमतीमध्ये सातत्यपूर्ण वाढ होत आहे. याचे पडसाद घर बांधणीचा खर्च वाढण्याच्या रूपाने होणार असून, परिणामी आगामी काळात घरांच्या किमती वाढणार असल्याचे भाकीत वर्तवले जात आहे. घरांच्या बांधणीसाठी आवश्यक स्टील, सिमेंट, वाळू, विटा, यांच्या विक्रीदरात वाढ झाली आहे, बांधकाम मजुरीच्या दरातदेखील वाढ होताना दिसत आहे. परिणामी, आगामी काळात मूळ बांधणी खर्चात वाढ होत आहे.
गेल्यावर्षी मुंबईत तब्बल दीड लाख मालमत्तांची विक्री झाली. यामध्ये ८० टक्के प्रमाण हे घरांचे होते, तर उर्वरित २० टक्के प्रमाण हे व्यावसायिक मालमत्तांचे होते. मात्र, लक्षणीय गोष्ट अशी की, ५ कोटी व त्यापुढील घरांचे हे घरांच्या एकूण विक्रीतील प्रमाण १५ टक्के इतके होते. या घरांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारे सामान, विशिष्ट पद्धतीच्या फरशा, सिमेंट, स्टील हे अनेक घर खरेदीदारांनी खास निवडून घेतले होते.
बांधकाम उद्योगामुळे ६ कोटी रोजगार
२०२३ प्रमाणे २०२४ मध्ये देखील आलिशान घरांच्या विक्रीत वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. देशात घर बांधणीचे प्रकल्प सुरू असून, या उद्योगात नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण ७ कोटी १० लाख लोक काम करत असल्याची माहिती आहे. त्याआधीच्या वर्षी या उद्योगात एकूण ६ कोटी ३९ लाख लोक कार्यरत होते.