मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी कांदिवलीतील बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन (५८) याला अटक केली. अटकेत असलेल्या महाव्यवस्थापक हितेश मेहताचे ७० कोटी त्याच्या ताब्यात असल्याचे समजताच ही कारवाई करण्यात आली. दोघांना न्यायालयाने २१ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, तसेच उन्ननाथन अरुणाचलम ऊर्फ अरुणभाईचा पोलिस शोध घेत आहेत.
मेहताने अटकेनंतर १२२ कोटी ताब्यात असल्याचा कबुलीनामा आरबीआयला सादर केला आहे. त्याच्या चौकशीतून कांदिवलीतील धर्मेशचे नाव समोर आले. मेहताकडून मे व डिसेंबर, २०२४ दरम्यान पावणेदोन कोटी, तसेच जानेवारीत ५० लाख अशी गुन्ह्यातील अपहार केलेली रक्कम धर्मेशकडून मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मेहताला कोणी मदत केली का, याचा तपास सुरू आहे. त्यानुसार बँकेतील अन्य कर्मचारीही रडारवर असून, पोलिस तपास करत आहेत.