मुंबई : राज्यातील १२ लाख बांधकाम मजुरांच्या लसीकरणाचा खर्च बांधकाम व्यावसायिकांकडून उचलला जाणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भातील आवाहन केले होते. त्यानुसार बिल्डर्स असोसिएशनने बांधकाम मजुरांच्या लसीकरणाचा खर्च उचलण्याची तयारी दर्शविली आहे.
सामाजिक जबाबदारी समजून द काॅन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) आणि महाराष्ट्र चेंबर आँफ हाऊसिंग इंडस्ट्री (एमसीएचआय) तसेच सर्व संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम मजुरांसह म्हाडा वसाहती, एसआरए इमारतीतील रहिवाशांचे लसीकरण मोफत लसीकरण करण्याचे आवाहन मंत्री आव्हाड यांनी केले होते. अनेक बांधकाम व्यावसायिकांशी यासंदर्भात चर्चा सुरू असून त्यांनी लसीकरणातील आपला हिस्सा उचलण्याची तयारी दर्शविल्याचे मंत्री आव्हाड म्हणाले होते. क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि रुस्तमजी ग्रुपचे बोमन आर. इराणी यांनी बांधकाम मजुरांच्या लसीकरणासाठी प्रस्ताव दिल्याचे सांगितले. बांधकाम मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांचे लसीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. राज्यातील १२ लाख कामगारांसह तर देशभरातील बांधकाम मजुरांचे लसीकरण विकासकांच्या खर्चातून केले जाणार असल्याचे इराणी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
यावर गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी क्रेडाई, एमसीएचआयचे आभार मानले. माझ्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून १२ लाख बांधकाम मजुरांचे लसीकरणाचा खर्च बिल्डर्स करणार असल्याचे टि्वट आव्हाड यांनी केले.