मुंबई : धारावीतील एक लाख अपात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी मिठागरांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अतिवृष्टीच्या काळात पूर्व उपनगरात माेठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असलेल्या या मिठागरांच्या जमिनींवर यापूर्वी वाजवी दरातील घरे बांधण्याचा घाट घालण्यात आला होता. या निर्णयाला विरोध झाल्याने पूर्वीच्या सरकारांनी ही योजना पुढे रेटली नाही. आता धारावीकरांच्या निमित्ताने सरकारी यंत्रणांचा हेतू सफल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिठागरांवर बांधकामे झाली, तर पूर्व उपनगरांचा पर्यावरणीय समतोल ढासळण्याची चिन्हे आहेत. याचा विपरीत परिणाम हाेण्याची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त हाेत आहे.
पक्ष्यांचे खाद्य नष्ट होण्याची भीती :
पूर्व उपनगरात वडाळा, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, आणिक, तुर्भे, घाटकोपर या ठिकाणी; तर पश्चिम उपनगरात मालवणी, दहिसर, मीरा-भाईंदर आणि विरार येथे मोठ्या प्रमाणावर मिठागरे आहेत. तेथे पूर्वीइतके मीठ उत्पादन होत नसले, तरी या पाणथळ जागांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो.
या मिठागरांच्या जमिनीत पाणी साठवण्याची मोठी क्षमता आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाच्या पूर्वेकडे वाशीची खाडी आहे. अतिवृष्टीवेळी खाडीचे पाणी पूर्व उपनगराकडे सरकण्याची भीती असते; परंतु मिठागरे हे पाणी अडवून ठेवतात.
खाडीच्या पाण्यासोबत काही प्रकारचे मासेही येतात. फ्लेमिंगो, बगळे यासारख्या पक्ष्यांना त्यामुळे खाद्य मिळते.
पूर्वीपासूनच जमिनी बळकावण्याचा प्रयत्न :
मुंबईतील एका मोठ्या विकासकाने काही वर्षांपूर्वी घर बांधणीसाठी या जागांची मागणी केली होती. विकासकांच्या संघटनाही या जागेसाठी आग्रही आहेत. या जागेवर ३०० ते ३६० चौ. फुटांची घरे बांधता येतील, असे गणित संघटनेने एका चर्चासत्रात मांडले .
यापूर्वी काही सरकारांनीही या जागेवर वाजवी दरातील घरबांधणीसाठी चाचपणी सुरू केली होती. मात्र, पूर्व उपनगरातील लोकांच्या विरोधाचा सूर पाहता पुढे काही झाले नव्हते.
धारावीच्या पुनर्विकासानिमित्ताने तेथे पुनर्वसन केले जाईलच. शिवाय बाजारभावाने विकण्यासाठी घरेही बांधली जातील. साधारण येथील लोकसंख्या एक लाखापेक्षा जास्त वाढेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.