Join us  

एमयूटीपी-३ साठी सल्लागार

By admin | Published: March 20, 2015 12:24 AM

रेल्वे अर्थकसंकल्पात मंजूर झालेल्या एमयूटीपी-३ प्रकल्पांमधील काही प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला आहे.

मुंबई : रेल्वे अर्थकसंकल्पात मंजूर झालेल्या एमयूटीपी-३ प्रकल्पांमधील काही प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला आहे. सुरुवातीला यातील प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार कंपनी नेमण्यात येणार असून निविदा प्रक्रियेद्वारे सल्लागाराची निवड केली जाणार असल्याचे एमआरव्हीसीकडून सांगण्यात आले. सल्लागार नेमल्यानंतर सहा महिन्यांत प्रकल्पांचा अभ्यास अहवाल सादर केला जाईल. सुरुवातीला एमयूटीपी-३ मधील विरार ते डहाणू तिसरा-चौथा मार्ग, ऐरोली-कळवा लिंक रोड आणि पनवेल-कर्जत दुहेरीकरण या प्रकल्पांसाठी सल्लागार कंपनीची निवड केली जाणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सध्या एमयूटीपी-२ अंतर्गत अनेक रेल्वे प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यामध्ये डीसी-एसी परावर्तन, हार्बरवर १२ डब्यांसाठी प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण, ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, अंधेरी ते गोरेगाव हार्बर मार्गाचे विस्तारीकरण या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांचे काम सुरू असतानाच एमयूटीपी-३ मधील ११ हजार ४४१ कोटी रुपये किमतीच्या सात प्रकल्पांना यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली. मंजुरी देण्यात आल्यानंतर आता यातील तीन प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला आहे. यामध्ये विरार ते डहाणू तिसरा-चौथा मार्ग, ऐरोली-कळवा लिंक रोड आणि पनवेल-कर्जत दुहेरीकरण प्रकल्पाचा समावेश असून त्यांच्या अभ्यास अहवालासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे. निविदा प्रक्रियेद्वारे निवडण्यात येणाऱ्या सल्लागार कंपन्यांसाठी निविदा भरण्याची अंतिम मुदत २३ एप्रिल देण्यात आली आहे. सल्लागार कंपनीची नियुक्ती केल्यानंतर त्यांना सहा महिन्यांत एमआरव्हीसीला अहवाल सादर करावा लागेल, असे एमआरव्हीसीतील सूत्रांनी सांगितले. यामध्ये रेल्वे मार्ग, सिग्नलसह अन्य तांत्रिक कामे, पूल, लागणारी जमीन आणि अन्य कामांचा समावेश आहे. विरार ते डहाणू तिसऱ्या-चौथ्या मार्गाच्या अभ्यासासाठी १ कोटी ६५ लाख ९0 हजार ६५0 रुपये तर ऐरोली-कळवा लिंक रोड आणि पनवेल-कर्जत दुहेरीकरणाच्या अभ्यासासाठी १ कोटी १३ लाख २५ हजार ६६0 रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)एमयूटीपी-३ या सात प्रकल्पांची एकूण किंमत ११ हजार ४४१ कोटी रुपये एवढी आहे. यात पनवेल-कर्जत दुहेरीकरण, ऐरोली-कळवा लिंक रोड, विरार ते डहाणू तिसरा आणि चौथा मार्ग यांसह स्थानकांचा विकास, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील दोन स्थानकांमधील रूळ ओलांडणे रोखण्यासाठी विविध योजना आणि तांत्रिक कामे तसेच नवीन डबे आणि लोकलची खरेदी अशा प्रकल्पांचा समावेश आहे.