...तर दिवाळीनंतर एक मात्रा घेतलेल्यांना लोकल प्रवास- राजेश टोपे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 08:59 AM2021-10-18T08:59:20+5:302021-10-18T09:01:05+5:30
आरोग्य विभाग, टास्क फोर्सच्या चर्चेनंतर निर्णय
मुंबई : दिवाळीनंतर कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात राहिल्यास निर्बंधांमध्ये सवलत देण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तविली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर हर्ड इम्युनिटी तयार झाल्यास आरोग्य विभाग, टास्क फोर्सच्या चर्चेनंतर सवलती दिल्या जाऊ शकतात. लसीची एक मात्रा घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास, माॅलमध्ये प्रवेशाची मुभा देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरून घेतला जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यात मोठ्या स्तरावर हर्ड इम्युनिटी आली असेल आणि टास्क फोर्स, आरोग्य विभागाची सहमती असेल तर लोकल, माॅलमधील प्रवेशात सवलत देता येईल. कोविशील्डच्या पहिल्या डोसनंतर दुसऱ्या डोससाठी तब्बल ८४ दिवसांचा कालावधी आहे. दोन डोसमधील मोठ्या अंतरामुळे नागरिकांची असुविधा होत आहे. त्यामुळे आरोग्याची, जीविताची काळजी घेत सवलतींचा निर्णय घेतला जाईल, असेही टोपे म्हणाले. आता दसरा झाला आहे. थोड्या दिवसांवर दिवाळी आहे. सणांमध्ये लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मंदिरे, थिएटर्स, नाट्यगृहे काही निर्बंधासह उघडली आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोनाची रुग्णसंख्या वाढते की कमी होते, या पार्श्वभूमीवर निर्णय होईल. रुग्णसंख्या आटोक्यात राहिल्यास सवलती देता येईल. राज्यामध्ये दिवाळीनंतरच्या कोरोना आकडेवारीच्या आधारे आरोग्य विभागाशी चर्चा करुन मुख्यमंत्री सवलतींबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री घेणार निर्णय
कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात राहिल्यास सवलत मिळेल. त्यासाठी आरोग्य सेतू अँपमध्ये जर ‘’सेफ’’ असे स्टेटस असल्यास सवलत देण्याचा विचार केला जाऊ शकतो. दिवाळीनंतरची स्थिती पाहून आरोग्य विभाग, टास्क फोर्सची सहमती असेल तर सवलती देण्याबाबत मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील, असेही टोपे यांनी सांगितले.