ग्राहकांना शीघ्र न्याय मिळण्यासाठी ग्राहक न्यायालयांचे बळकटीकरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:07 AM2021-03-16T04:07:02+5:302021-03-16T04:07:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ग्राहक हक्कांबद्दल, तसेच ग्राहक तक्रार निवारण आयोगाबद्दल लोकांना पुरेशी माहिती नाही. यासंदर्भात व्यापक जनजागृतीची ...

Consumer courts should be strengthened to ensure speedy justice for consumers | ग्राहकांना शीघ्र न्याय मिळण्यासाठी ग्राहक न्यायालयांचे बळकटीकरण करावे

ग्राहकांना शीघ्र न्याय मिळण्यासाठी ग्राहक न्यायालयांचे बळकटीकरण करावे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ग्राहक हक्कांबद्दल, तसेच ग्राहक तक्रार निवारण आयोगाबद्दल लोकांना पुरेशी माहिती नाही. यासंदर्भात व्यापक जनजागृतीची गरज असून, समाजातील सुज्ञ लोकांना ग्राहक जनजागृतीच्या कार्याशी जोडले गेले पाहिजे. पीडित ग्राहकांना शीघ्र गतीने न्याय मिळण्यासाठी राज्यातील ग्राहक न्यायालयांचे बळकटीकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

जागतिक ग्राहक दिनानिमित्त राज्य ग्राहक न्यायालयातर्फे आयोजित चर्चासत्रात राज्यपाल कोश्यारी यांनी मार्गदर्शन केले. आज पारंपरिक दुकानांशिवाय ई-कॉमर्सच्या माध्यमातून लोक वस्तू विकत घेत आहेत. अनेकदा ग्राहकांना नवनवीन अडचणी येतात; परंतु त्यांचे निवारण कसे व कुठे करायचे, हे त्यांना माहिती नसते. ग्राहक न्यायालयांनी केवळ न्यायदानाचे काम न करता व्यापारात नैतिकतेचा आग्रह धरला पाहिजे, असे कोश्यारी म्हणाले.

ग्राहक न्यायालयांनी इंग्रजीचा वापर न करता स्थानिक भाषेत कार्यालयीन कामकाज करावे अशीही सूचना राज्यपालांनी केली.

राज्यात विविध स्तरावर फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय मिळण्यासाठी न्यायव्यवस्था उपलब्ध आहे. केंद्राने ग्राहक संरक्षणासाठी चांगले कायदे केले आहेत. बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून ग्राहकांच्या हक्कासाठी मोठे काम केल्याचे स्मरण करून देऊन राज्यातील ग्राहक न्यायालयांनी न्यायदानाबाबत नवी दिशा दिली पाहिजे, अशी अपेक्षाही राज्यपालांनी व्यक्त केली.

राज्य ग्राहक न्यायालयाचे सदस्य डॉ. संतोष काकडे यांनी हे चर्चासत्र आयोजित करण्याची भूमिका स्पष्ट केली. चर्चासत्रात राज्य ग्राहक न्यायालयाचे माजी अध्यक्ष न्या. आर. सी. चव्हाण, माजी अध्यक्ष न्या. अशोक भंगाळे, केंद्रीय ग्राहक न्यायालयाच्या माजी सदस्य राजलक्ष्मी राव, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रभारी अध्यक्ष दिलीप शिरासाव आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Consumer courts should be strengthened to ensure speedy justice for consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.