ग्राहक मंचाचा पालिकेला दणका; जलतरणपटूला २२ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 06:17 AM2024-08-16T06:17:42+5:302024-08-16T06:18:24+5:30

पालिकेने दाद न दिल्याने अखेरीस तक्रारदाराने सहा महिन्यांचे सभासदत्व शुल्क भरले आणि ग्राहक मंचात तक्रार दाखल केली

Consumer forum bump to municipal commissioner; Order to pay compensation of Rs.22 thousand to national swimmer | ग्राहक मंचाचा पालिकेला दणका; जलतरणपटूला २२ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश

ग्राहक मंचाचा पालिकेला दणका; जलतरणपटूला २२ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दादर येथील मुंबई महापालिकेच्या महात्मा गांधी तरण तलाव सदस्यांकडून शुल्क आकारूनही त्यांना  पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात पालिकेने कसूर केला आहे, असे म्हणत मध्य मुंबईच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने पालिका आयुक्तांना तक्रारदार असलेल्या राष्ट्रीय जलतरणपटूला शारीरिक, मानसिक त्रास आणि तक्रार करण्यासाठी आलेला खर्च म्हणून २२ हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश जुलैमध्ये दिले.

राज्य व राष्ट्रीय पातळीची एक जलतरणपटू महात्मा गांधी तरण तलावाची सदस्य आहे. डिसेंबर २०२१मध्ये तिने महापालिकेच्या परिपत्रकानुसार आपल्याला सदस्यत्व शुल्कात सवलत देण्याची मागणी तरण तलाव व्यवस्थापनाकडे केली. मात्र, पालिकेकडून तिला त्याचा लाभ देण्यास नकार देण्यात आला.
पालिकेच्या परिपत्रकानुसार, राष्ट्रीय, राज्यस्तरीय तसेच दादोजी कोंडदेव पुरस्कार, अर्जुन पुरस्कार व अन्य पुरस्कार प्राप्त  असलेल्या खेळाडूंकडून  वार्षिक सभासदत्व शुल्क १०० रुपये आकारण्यात येईल.
अनेकवेळा अर्ज करून, पालिकेच्या कार्यालयात खेटे घालूनही पालिकेने दाद न दिल्याने अखेरीस तक्रारदाराने सहा महिन्यांचे सभासदत्व शुल्क भरले आणि ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.

पालिकेने आपल्याला सवलत दिलेली नाही. तसेच पूर्ण शुल्क भरूनही आपल्याला अनेक असुविधांचा सामना करावा लागत आहे. तरण तलावाचे नळ खराब आहेत. बाथरूमचे दरवाजे, कड्या तुटलेल्या आहेत. तरण तलावाजवळच्या फरश्या निसरड्या आणि तुटलेल्या आहेत. त्यामुळे सदस्यांना शारीरिक इजा होऊ शकते, असे तक्रारीत म्हटले आहे.

मंचाने  नोटीस बजावल्यानंतर पालिकेने तक्रारीवर उत्तर दिले. तक्रारदार राज्य व राष्ट्रीय पातळीवरची जलतरणपटू असली तरी तिने खासगी संघटनेद्वारे जलतरण स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. राज्य सरकारने किंवा कोणत्याही जिल्ह्याने तिला आपले प्रतिनिधी म्हणून स्पर्धेमध्ये सहभागी केले नाही, असे पालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे आयोगाला सांगितले.

तरण तलावाजवळ असलेल्या अस्वच्छतेबाबत आणि गैरसुविधांबाबत तक्रारदार व अन्य सदस्यांनी वारंवार तक्रारी करूनही पालिकेने त्याची दखल घेतली नाही. हा तरण तलाव ऑलिम्पिक दर्जाचा आहे. पालिका सार्वजनिक संस्था असल्याने तरण तलावाची देखभाल करण्यासाठी सरकारचा निधी वापरत आहे. तसेच सदस्यांकडून सहा महिन्यांसाठी ५,३०० रुपये शुल्कही आकारत आहे. हजारो लोक या तरण तलावाचे सदस्य आहेत. एकावेळी ५०० लोक येथे पोहण्याचा सराव करण्यासाठी येतात. या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी आणि किमान सुविधा पुरविण्यासाठी सदस्यांना पालिकेचे लक्ष वेधून घ्यावे लागते, हे दुर्दैव आहे. सदस्यांना पोहण्यासाठी सुरक्षित, स्वच्छ तरण तलाव  आणि किमान सुविधा उपलब्ध करणे, हे पालिकेचे कर्तव्य आहे,’ असे निरीक्षण मंचाने  नोंदविले.

डायविंग नादुरुस्त ठेवणे, नळ नीट नसणे, फरश्या निसरड्या असणे, चेंजिंग रूमचे दरवाजे तुटलेले असणे यावरून पालिकेने कर्तव्यात कसूर केल्याचे दिसते. याची तक्रार करण्यासाठी तक्रारदार अनेकवेळा पालिकेच्या कार्यालयात गेली, तिने अनेकवेळा अर्ज केले. मात्र, ते प्रलंबित ठेवण्यात आले. तिचा मानसिक आणि शारीरिक छळ झाला. त्यामुळे पालिका आयुक्तांनी मानसिक, शारीरिक छळापोटी १५,००० रुपये आणि तक्रार करण्यासाठी आलेला खर्च म्हणून ७,००० रुपये नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश ग्राहक मंचाने दिले.

  • केवळ एका वर्षासाठी ‘विशेष प्रकरण’ म्हणून तिला सभासदत्व शुल्कात सवलत देत आहोत. त्याशिवाय तक्रारदाराने केलेल्या सर्व गैरसोयींची दखल घेऊन दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. 
  • दररोज सुमारे ५०० खेळाडू जलतरण तलावात पोहण्यासाठी येतात. स्वच्छता राखण्यासाठी पालिका सर्वोपरी प्रयत्न करीत असते, असे पालिकेने मंचाला सांगितले.

Web Title: Consumer forum bump to municipal commissioner; Order to pay compensation of Rs.22 thousand to national swimmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.