चढ्या भावाने सोने विकणाऱ्या व्यापाऱ्याला ग्राहक मंचाचा दणका; मुंबईत धक्कादायक प्रकार उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 10:21 AM2024-06-12T10:21:21+5:302024-06-12T10:22:36+5:30
बुक केलेल्या दरानेच मंगळसूत्र बनवून देण्याचे आदेश.
मुंबई : दागिन्यांची ऑर्डर देताना त्याची संपूर्ण रक्कम भरली नाही तरी दागिना ऑर्डर दिल्याच्या तारखेचा सोन्याचा भाव लावू, असे आश्वासन देऊन ऐनवेळी चढ्या भावाने सोन्याचा भाव लावणाऱ्या प्रसिद्ध सोने व्यापाऱ्याला मध्य मुंबई जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगाने दणका दिला. तीन वर्षांपूर्वी ग्राहकाने बुक केलेल्या दरानेच त्याला मंगळसूत्र बनवून देण्याचे आदेश ग्राहक मंचाने व्यापाऱ्याला दिले आहेत.
मुकेश सुर्वे (बदललेले नाव) याने २०१७ मध्ये २८ हजार ५०० प्रति ग्रॅमने ३.५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र बनविण्याची ऑर्डर मुंबईतील प्रसिद्ध ज्वेलर्सकडे दिली. त्यावेळी मुकेशने सर्व रक्कम एकदाच भरू शकत नाही, असेही सोने व्यापाऱ्याला सांगितले. सोने व्यापाऱ्याने मंगळसूत्र बुक केल्याच्या तारखेला असलेल्या भावानेच मंगळसूत्र बनवून देऊ, असे तोंडी आश्वासन त्याला दिले, तसेच सोने व्यापाऱ्याने ही रक्कम बी.सी. लावून पूर्ण करण्यास सांगितले. त्यानुसार मुकेशने संबंधित सोने व्यापाऱ्याकडे दरमहा ५ हजारांची बी.सी. लावली. तीन वर्षांनंतर सोने व्यापाऱ्याकडे त्याचे १ लाख ७५ हजार रुपये जमा झाले. १ ऑक्टोबर २०२० रोजी मुकेशने बी.सी. बंद करून मंगळसूत्र मागितले असता व्यापाऱ्याने नकार दिला. तीन वर्षांपूर्वीच्या दराऐवजी ५० हजार रुपये प्रति ग्रॅम असलेल्या भावाने मंगळसूत्र मिळेल, असे व्यापाऱ्याने संगितले.
या प्रकरणातील निरीक्षण-
ग्राहक मंचाने व्यापाऱ्याचा युक्तिवाद फेटाळला. ग्राहकाला २८ हजार ५०० रुपये भावाने मंगळसूत्र बनवून देण्यात येईल, असे आमिष दाखवून बी. सी. लावण्यास प्रवृत्त केले. सोने व्यापाऱ्याने त्याचे पैसे स्वतःच्या व्यवसायासाठी वापरले आणि नफाही कमविला. सोने व्यापाऱ्याने अनुचित व्यापार पद्धतीचा वापर केला आहे, असे निरीक्षण नोंदवीत ग्राहक मंचाने सोने व्यापाऱ्याला मुकेशला तीन वर्षांपूर्वीच्या अर्थात २८ हजार ५०० रुपये प्रति ग्रॅमच्या दराने मंगळसूत्र बनविण्याचे आदेश दिले.
४२ हजार प्रति ग्रॅम-
१) मुकेशने रिसीट दाखविल्यानंतर व्यापाऱ्याने ४२ हजार रुपये प्रति ग्रॅम भाव लावण्याची तयारी दर्शविली.
२) व्यापारी लुटत असल्याचे लक्षात येताच मुकेशने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी ग्राहक मंचात तक्रार करण्याचा सल्ला मुकेशला दिला.
तीन वर्षांनी जुन्याच भावाने सोने देणे शक्य नाही-
१) मुकेश ग्राहक मंचात तक्रार केली. सोने व्यापाऱ्याने सर्व आरोप फेटाळले. १० हजार बुकिंग रक्कम देऊन तीन वर्षांनंतर जुन्याच भावाने सोने देणे शक्य नाही. तीन महिन्यांत पैसे जमा करून मंगळसूत्र घेण्यास ग्राहकाला सांगण्यात आले.
२) त्यादरम्यान, ग्राहकाने बी.सी. लावली. तीन महिन्यांनी घेऊ न शकलेल्या ग्राहकाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली, तरीही तो मंगळसूत्र घेऊ शकला नाही. त्यामुळे त्याची ऑर्डर रद्द करण्यात आली, असा युक्तिवाद सोने व्यापाऱ्याने केला.