ग्राहक संरक्षण कायदा आला, पण न्यायालयांची स्थापना नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 01:19 AM2020-08-13T01:19:24+5:302020-08-13T01:19:29+5:30

अधिसूचनेची प्रतीक्षा; मुंबई ग्राहक पंचायतचे केंद्र सरकारला पत्र

The Consumer Protection Act came into force, but the courts were not established | ग्राहक संरक्षण कायदा आला, पण न्यायालयांची स्थापना नाही

ग्राहक संरक्षण कायदा आला, पण न्यायालयांची स्थापना नाही

Next

मुंबई : ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांची फसवणूक टाळण्यासाठी लागू झालेल्या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक आयोग आणि राज्य ग्राहक आयोग (ग्राहक न्यायालये) पुनर्स्थापित करण्याची अधिसूचना काढणे क्रमप्राप्त आहे. मात्र, महाराष्ट्रात तशी अधिसूचना काढण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आला पण त्यातील ग्राहक न्यायालये कोठे आहेत, असा प्रश्न मुंबई ग्राहक पंचायतने उपस्थित केला आहे.

आॅगस्ट, २०१९ संसदेने संमत केलेला आणि राष्ट्रपतींनी मान्यता दिलेला ग्राहक संरक्षण कायदा जुलै २०२० मध्ये प्रत्यक्षात आला. त्यानंतर नव्या वाढीव आर्थिक कार्यकक्षांसह जिल्हा, राज्य, राष्ट्रीय ग्राहक आयोग कार्यान्वित होणे अपेक्षित होते. मुंबई ग्राहक पंचायतने देशभरातील विविध राज्यांमध्ये चौकशी केल्यानंतर महाराष्ट्रासह कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडूत अशा प्रकारची अधिसूचना निघाली नसल्याची माहिती पुढे आली. अधिसूचनेविना देशातील कोणतेही ग्राहक न्यायालय नव्या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार काम करू शकणार नाही. तसे केल्यास ते संपूर्णपणे बेकायदा ठरेल, असेही मुंबई ग्राहक पंचायतने सचिवांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

मुंबई ग्राहक पंचायतने ग्राहक व्यवहारमंत्री राम विलास पासवान आणि ग्राहक व्यवहार खात्याच्या सचिवांना पत्र पाठवून याबाबतीत केंद्र शासनाने त्वरित अधिसूचना जारी करून राष्ट्रीय ग्राहक आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार खात्याने सर्व राज्य सरकारांना सूचना देऊन प्रत्येक राज्यातही जिल्हा आणि राज्य ग्राहक आयोग पुनर्स्थापित करण्याबाबत नव्या कायद्यानुसार अधिसूचना जारी करण्याचे आदेश द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

अधिसूचनेवरून संभ्रमाचे वातावरण
नव्या ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम २८(१) आणि ४२(१) या कलमांनुसार राज्य शासनाने जिल्हा ग्राहक आयोग आणि राज्य ग्राहक आयोग नव्याने स्थापन करण्यासाठी अधिसूचना जारी करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, पंचायतने त्याबाबत केंद्रीय ग्राहक व्यवहार खात्याकडे चौकशी केली असता, अशा अधिसूचनेची काही गरजच नसल्याचा दावा केला. राष्ट्रीय ग्राहक आयोग नव्याने स्थापन करण्यासाठी कलम ५३(१) अन्वये केंद्राने अधिसूचना जारी करणे बंधनकारक असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर कायदेशीर मत घेऊन कार्यवाही करू, असे आश्वासन देण्यात आले आहे.
- शिरीष देशपांडे, कार्याध्यक्ष, मुंबई ग्राहक पंचायत

Web Title: The Consumer Protection Act came into force, but the courts were not established

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.