Join us

दोषपूर्ण चष्मा दिल्याने चष्म्याच्या व्यापाऱ्याला ग्राहक मंचाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 2:23 AM

पैसे परत करण्याचे आदेश : सूचनेचे पालन न केल्याचा ठपका

मुंबई : मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीला चष्म्याची निकड असताना, त्याला दोषपूर्ण चष्मा दिल्याने ग्राहक तक्रार निवारण मंचाने चष्म्याच्या व्यापाºयाला ग्राहकाला चष्म्याचे ११,५८० रुपये परत करण्याचे आदेश दिले. बोरीवलीचे रहिवासी आदीनाथ लगडे यांची २०१७ मध्ये मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर, डॉक्टरांनी त्यांना चष्म्याचा नंबर काढून देत, जवळच्याच ‘कॉन्टाकेअर’ या चष्म्याच्या व्यापाºयाकडून चष्मा बनविण्यास सांगितले. त्यानुसार, आदीनाथ यांनी कॉन्टाकेअरमध्ये ११,५८० रुपयांचा चष्मा बनविण्यासाठी दिला. आदीनाथ यांना सतत संगणकावरच काम करायचे असल्याने त्यांना चष्म्याची निकड होती. तीन दिवसांनी ते चष्मा घेण्यासाठी गेले असता, त्यांच्या चष्म्यात दोष आढळला. ३५ सेंटीमीटरच्या पुढे त्यांना काहीच दिसत नव्हते. त्याशिवाय त्यांच्या सूचनेनुसार व गरजेनुसार चष्मा बनविण्यात आला नाही.

चष्म्याच्या व्यापाºयानेही चष्म्यात दोष असल्याचे मान्य केले व आठ दिवसांत दोषविरहीत चष्मा देण्याचे आश्वासन दिले. आदीनाथ आठ दिवसांनी पुन्हा चष्मा घेण्यासाठी गेले असता, तोच चष्मा देण्यात आला. त्याच्यात तेच दोष होते. त्यामुळे आदीनाथ यांनी चष्म्याचे ११,५८० रुपये परत करण्यास सांगितले. व्यापाºयाने पैसे परत करण्यास नकार दिल्याने आदीनाथ यांनी ग्राहक मंचात तक्रार केली.सदर प्रकरणी ग्राहक मंचाने चष्म्याच्या व्यापाºयाला नोटीस बजावली. व्यापाºयाने ग्राहक मंचात आपली बाजू मांडली नाही. त्यामुळे हे प्रकरण एकतर्फा चालले. ‘कॉन्टाकेअर’ला आदीनाथ यांना चष्म्याची संपूर्ण रक्कम म्हणजेच ११,५८० रुपये, मानसिक व शारीरिक त्रासापोटी १०,००० रुपये आणि तक्रार लढविण्यासाठी आलेला खर्च म्हणून १०,००० रुपये देण्याचा आदेश मंचाने दिला.सेवा पुरविण्यात केली कसूर !‘मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी चष्मा अत्यंत आवश्यक आहे, पण सामनेवाला (चष्म्याचे व्यापारी) यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदाराला नाहक त्रास सहन करावा लागला. तक्रारदाराची तक्रार पोहोचूनसुद्धा सामनेवाला यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काही करारानुसार व्यापाऱ्यांनी ग्राहकाच्या मागणीनुसार व गरजेनुसार, तसेच ठरलेल्या वेळेत त्यांची गरज पूर्ण करणे, ही व्यापाºयांची कायदेशीर व व्यावसायिक गरज आहे. सदर प्रकरणी व्यापाºयाने ग्राहकाच्या मागणीनुसार व गरजेनुसार वेळेत चष्मा दिला नाही. बाजू मांडण्याची संधी देऊनही ते मंचासमोर हजर राहू शकले नाहीत. सामनेवाले यांनी तक्रारदारांना सेवा पुरविण्यात कसूर केली आहे,’ असे निरीक्षण मंचाने नोंदवले.

टॅग्स :मुंबई