ग्राहकांना वीज जोडणीच्या योजनांची माहितीच मिळेना, महावितरणने क्षेत्रीय कार्यालयांना दिला 'शॉक'  

By सचिन लुंगसे | Published: January 1, 2024 06:10 PM2024-01-01T18:10:57+5:302024-01-01T18:11:36+5:30

Mahavitaran News: राज्यात अनेक ठिकाणी नवीन सेवा वीज जोडणीच्या पर्यायाची माहिती ग्राहकांना देण्यात येत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत.

Consumers do not get information about electricity connection plans, Mahavitaran gives 'shock' to regional offices | ग्राहकांना वीज जोडणीच्या योजनांची माहितीच मिळेना, महावितरणने क्षेत्रीय कार्यालयांना दिला 'शॉक'  

ग्राहकांना वीज जोडणीच्या योजनांची माहितीच मिळेना, महावितरणने क्षेत्रीय कार्यालयांना दिला 'शॉक'  

मुंबई - राज्यात अनेक ठिकाणी नवीन सेवा वीज जोडणीच्या पर्यायाची माहिती ग्राहकांना देण्यात येत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे कृषिपंप वगळून उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तात्काळ नवीन वीज जोडणी किंवा वीजभार वाढवून देण्यासाठी आवश्यक पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचे काम महावितरणकडून हाती घेण्यात आले आहे. परिणामी आता तात्काळ ग्राहकांना नवीन वीज जोडणी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नवीन जोडणीसाठी नवीन सेवा जोडणी योजनेचा पर्याय ग्राहकांना सर्वप्रथम देण्यात यावा. निश्चित केलेल्या कालावधीत सेवा देण्यात यावी, असे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना महावितरणकडून देण्यात आले आहे.
 
नवीन वीज जोडण्या देण्यासाठी कोणत्या ३ योजना
१) नवीन सेवा जोडणी
२) नॉन डीडीएफ ग्राहक योगदान व परतावा
३) समर्पित वितरण सुविधा
 
ग्राहकाला खर्च करावा लागणार नाही
नवीन वीजजोडणी देण्यासाठी नवीन सेवा जोडणी योजना महत्वाची आहे. योजने अंतर्गत नवीन वीज जोडणी देणे किंवा वीज भार कमी अधिक करण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यक पायाभूत सुविधांची व यंत्रणेची कामे महावितरणकडून करण्यात येतील. त्यासाठी ग्राहकास कोणताही खर्च करावा लागणार नाही. तर केवळ सेवा जोडणी शुल्क व सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागेल.
 
परतावा समायोजित होणार
नॉन डीडीएफ ग्राहक योगदान व परतावा योजनेमध्ये अर्जदार ग्राहक स्वतःच्या खर्चाने परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून महावितरणच्या अंदाजपत्रकाप्रमाणे व देखरेखीखाली पायाभूत वीज यंत्रणा उभारण्याचे काम करतात. या खर्चाचा परतावा संबंधित वैयक्तिक अर्जदाराला किंवा ग्राहकांच्या गटाला मासिक वीजबिलांमध्ये समायोजित केला जातो.
 
दुरुस्तीची जबाबदारी महावितरणची
समर्पित वितरण सुविधा योजनेमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी किंवा अर्जदार ग्राहकांनी स्वतःच्या खर्चाने परवानाधारक विद्युत कंत्राटदारांद्वारे स्वतंत्र वीजवाहिन्या, वितरण रोहित्र, उपकेंद्र, क्षमतावाढ आदी पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचे काम केल्यास या वीजयंत्रणेची सुविधा संबंधित ग्राहकांसाठी समर्पित राहते. मात्र ही वीजयंत्रणा महावितरणकडे हस्तांतरित केली जाते आणि देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महावितरणकडे कायम राहते.  
 
पायाभूत वीजयंत्रणेची कामे करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता नाही.
 
काय आहेत आदेश
- क्षेत्रीय कार्यालयांनी वीजखांब, वितरण रोहीत्र, स्विच गिअर्स, वीजवाहिन्यांसह आवश्यक साधनसामग्री उपलब्ध ठेवावी.
- ग्राहकांना तात्काळ नवीन वीजजोडणी उपलब्ध करून द्यावी. या योजनेमध्ये वीज भार वाढवण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची कामे सुद्धा अंतर्भूत करण्यात आली आहेत.
- समर्पित वितरण सुविधा योजनेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांकडून तसा लेखी अर्ज घेऊनच त्यामध्ये कामे करण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.

Web Title: Consumers do not get information about electricity connection plans, Mahavitaran gives 'shock' to regional offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.