मुंबई : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, वर्क फ्रॉम होमचा वाढता कालावधी आणि गृह कर्जावरील व्याजदरात झालेली घट यामुळे आता मुंबई व शहरालगत २-३ बीएचके घर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा वाढत आहे. विशेषत: मुंबईतील लोअर परळ, भायखळा, चेंबूर, बोरिवली या परिसरात घर खरेदी करणे अधिक पसंत केले जात आहे. शहरालगत असणाऱ्या लोणावळा, डहाणू, वाडा येथे २ बीएचके व सेकंड होम्स घरांची विक्री अधिक वाढत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
सध्या तरुण वर्गाचा कार्यालयाच्या जवळपास घर घेण्याकडे कल आहे. कुटुंब व मित्रांसोबत जास्त वेळ घालवता यावा, यासाठी मोठ्या आकाराच्या घर खरेदीकडे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात वळला आहे. त्यात २ बीएचके आणि ३ बीएचके घरांच्या किमतीही काही प्रमाणात कमी झाल्याचे पाहायला मिळत असल्याचे द बाया कंपनीचे संचालक रोहित खरचे यांचे म्हणणे आहे.
सध्या गृहनिर्माण क्षेत्रात हॉलिडे होम, व्हॅकेशन होम आणि सेकंड होम या संकल्पना रूढ होत आहेत. शहरातील दाट लोकवस्ती आणि आयुष्याचा वेग पाहता सेकंड होम्सचा पर्याय पुढे आला आहे. सुटीची मजा व मन:शांती मिळावी तसेच नव्या ऊर्जेसह जोमाने पुढच्या कामाला लागता यावे, यासाठी अनेक जण आरामदायी जीवनाचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या घरांचा पर्याय स्वीकारत आहेत. त्यात ग्राहकांना २ बीएचकेचा पर्याय अधिक सोयीचा वाटत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सेकंड होम घरांचा आकार व अनुकूल रचना, त्याचबरोबर मोकळी जागा आणि विविध सोयीसुविधांकडे ग्राहक विशेष लक्ष देत आहेत. यासाठी अनेक ग्राहक मोठ्या घरांकडे वळले असल्याचे चित्र आहे. खोपोली आणि वाडा येथील घरांना सर्वाधिक मागणी आहे. कोरोनाच्या काळात १०० सेकंड होमची विक्री केल्याचे निर्वाणा रिॲल्टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनित अग्रवाल यांनी सांगितले.