६८ टक्के भारतीय म्हणतात, ‘ब्रॅन्ड’ का करेंगे घर में स्वागत!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 11:14 AM2018-10-31T11:14:41+5:302018-10-31T11:23:37+5:30
दिवाळी आणि खरेदी यांचे अतूट नाते आहे. भारतीय सणांमधील महत्त्वाचे स्थान असलेल्या दिवाळीला प्रत्येकजण आपल्या आर्थिक क्षमतेनूसार खरेदी करतो.
महेश चेमटे
मुंबई - दिवाळी आणि खरेदी यांचे अतूट नाते आहे. भारतीय सणांमधील महत्त्वाचे स्थान असलेल्या दिवाळीला प्रत्येकजण आपल्या आर्थिक क्षमतेनूसार खरेदी करतो. ‘ऑनलाईन’ आणि ‘ऑफलाईन’ खरेदीसाठी विविध प्रकराचे ‘ऑप्शन’ समोर असल्याने नेमक्या आणि फायदेशीर वस्तू कोणत्या? या विचारचक्रात बहुतांशी नागरिक अडकतात. तथापि, जागतिक संस्थेच्या सर्व्हेक्षणानूसार, तब्बल ६८ टक्के भारतीय ब्रॅन्डेड खरेदीला पसंती देत असल्याची माहिती समोर आली आहे.
भारतासह, ब्राझिल, चीन, यूएस, यूके, फ्रान्स, जर्मनी आणि जपान या आठ देशांच्या मार्केट खरेदीबाबत नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. जागतिक दर्जाच्या मार्केट एजंसी अहवालानूसार, भारतातील तब्बल ६८ टक्के भारतीय नागरिक खरेदीसाठी ब्रॅन्डेड वस्तूला पसंती देत असल्याची माहिती समोर आली आहे. कमी वेळात योग्य वस्तू खरेदी करण्यासाठी ब्रॅन्डेड वस्तूंची खरेदी फायदेशीर असल्याचे ६४ टक्के भारतीयांचे म्हणणे आहे. गतवर्षी बॅ्रन्डेड वस्तूखरेदीकडे ६५ टक्के भारतीयांचा कल होता. यंदा यात ३ टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
सर्व प्रकारच्या मार्केटमध्ये तब्बल ६४ टक्के नागरिक बॅन्डेड वस्तूला पसंती देत आहेत. ब्रॅन्डेड वस्तूंसाठी आठ देशांतील नागरिकांपैकी २९ टक्के नागरिक ब्रॅन्डेड वस्तूंच्या जाहिराती पाहून, २५ टक्के नागरिक ट्विट किंवा ई-मेलच्या माध्यमातून संपर्क करुन, २७ टक्के नागरिक समाजमाध्यमांद्वारे आणि १८ टक्के नागरिक माध्यमांवरील ब्रॅन्डेड संदर्भातील वृत्त पाहून ब्रॅन्डेड वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
ब्रँडेड वस्तू खरेदी केल्यानंतर संबंधित वस्तूबाबत तक्रार अथवा अडचण उदभवल्यास त्या तातडीने मार्गी लावण्यात येतात. विशेष म्हणजे अशा प्रकरणामध्ये ग्राहकांना अटेंड योग्य प्रकारे करण्यात येत असल्यामुळे साहजिकच नागरिक ब्रँडेड वस्तू कडे आकर्षित होत आहे.
ब्रॅन्डेड वस्तूंच्या खरेदीबाबत आढावा (आकडे टक्क्यांमध्ये)
देश २०१७ २०१८
चीन ७३ ७८
भारत ६५ ६८
फ्रान्स ५० ६५
जपान ३९ ६०
ब्राझिल ५६ ६९
यू.एस. ४७ ५९
यू.के. ३७ ५७
जर्मनी ३७ ५४