बेक्ड फराळाला ग्राहकांची पसंती, मागणीत वाढ
By admin | Published: November 8, 2015 02:46 AM2015-11-08T02:46:29+5:302015-11-08T02:46:29+5:30
नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर असणाऱ्या महिलांना दिवाळीच्या दिवसात साग्रसंगीत फराळ बनवणे शक्य नसते. अशा वेळी अनेक जणी रेडिमेड फराळांचा पर्याय निवडतात.
मुंबई : नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर असणाऱ्या महिलांना दिवाळीच्या दिवसात साग्रसंगीत फराळ बनवणे शक्य नसते. अशा वेळी अनेक जणी रेडिमेड फराळांचा पर्याय निवडतात. त्यातही फिटनेसबाबत दक्ष असणाऱ्या गृहिणींनी यंदा डाएट फराळाला पसंती देत ‘हेल्थ कॉन्शस’ राहणेच पसंत केले आहे.
शहर-उपनगरातील दादर, गिरगाव, परळ, लालबाग, बोरीवली, मालाड, गोरेगाव अशा ठिकाणी रेडिमेड फराळांचे स्टॉल लावलेले दिसत आहेत. भाजणीची चकली, पोह्यांचा चिवडा, शंकरपाळी, कडबोळी, अनारसे, शेव इ. पदार्थ या स्टॉल्सवर सहज मिळतात. तसेच अनेक दुकानांनी यंदा आरोग्यासाठी चांगल्या
अशा बेक्ड फराळांचाही समावेश केला आहे.
कमीत कमी तेल, तुपाचा वापर करून बेक्ड केलेले हे फराळ डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. यात शंकरपाळी, चकली, कडबोळी, शेव, चिरोटे, बाकरवडी हे पदार्थ बेक्ड मिळतात. याव्यतिरिक्त करायला सगळ्यात कठीण आणि वेळखाऊ अशी करंजीसुद्धा अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. करंजीचे सुकी आणि पाकातील असे दोन पर्याय आहेत. शिवाय यांच्या सारणातही विविधता मिळते. यात ड्रायफ्रूट, ओला नारळ, रवा, पिठाच्या सारणांचा यात समावेश आहे. यांची किंमत रोजच्या तळणीच्या फराळापेक्षा १० ते २० रुपयांनी अधिक आहे. पारंपरिक पद्धतीचा फराळ आणि बेक्ड फराळाच्या चवीत फारसा फरक नाही. याउलट बेक्ड फराळ काकणभर अधिक चविष्ट लागतो असे अनेकांना वाटते. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बेक्ड फराळाची मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे हा फराळ बनवताना भाजणे, तळणे हा त्रास वाचतो.
तसेच हे बेक्ड फराळाचे पदार्थ आॅइलफ्री असल्यामुळे यांना भरून ठेवणेही कठीण नसते आणि खास काळजी घ्यावी लागत नाही, असेही अनेकींना वाटते. एकंदरच फराळाचा विचार करता यंदा बेक्ड फराळ चांगलाच भाव खाऊन गेला आहे. (प्रतिनिधी)
चकली - ३०० ते ३६० रु़ किलो
कडबोळी- २०० ते ३०० रु़किलो
शेव - २४० ते २६० रु़किलो
लसूण शेव - २०० ते २६० रु़किलो
शंकरपाळे- १५० ते २०० रु़किलो
करंजी - १५ ते २२ रु़नग
अनारसा - १८ ते २० रु़नग
बेसन लाडू - २० ते २५ रु़नग
रवा लाडू - २० ते २५ रु़ नग
चिवडा - ३०० ते ३२० रु़किलो
चिरोटे - २०० ते २४० रु़किलो
बाकरवडी - २०० ते २५० रु़किलो
हल्ली ग्राहक तेलकट- तुपकट पदार्थ टाळतात. कारण अनेक जण मेटेंन राहण्यासाठी डाएट करतात. अशा ग्राहकांसाठी शंकरपाळी, करंजी हे पदार्थ बेक्ड करतो आणि याला ग्राहकांची मागणी आहे.
- विक्रेता, पणशीकर, दादर