ग्राहकांना तुटीचा ‘बेस्ट शॉक’ कायम
By admin | Published: December 22, 2015 01:51 AM2015-12-22T01:51:30+5:302015-12-22T01:51:30+5:30
बेस्टमार्फत कुलाबा ते सायन व चर्चगेट ते माहीम या शहर भागातील सुमारे ९ लाख ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो़ नफ्यात असलेला हा विभाग वाहतूक विभागाचे ओझे गेली
मुंबई : बेस्टमार्फत कुलाबा ते सायन व चर्चगेट ते माहीम या शहर भागातील सुमारे ९ लाख ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो़ नफ्यात असलेला हा विभाग वाहतूक विभागाचे ओझे गेली अनेक वर्षे पेलत आहे़ वाहतूक विभागाची तूट भरून काढण्यासाठी बेस्टने वीज ग्राहकांच्या बिलातून परिवहन तूट अधिभार वसूल करण्यास सुरुवात केली़ याबाबत अनेकदा वाद होऊनही या अधिभारातून अद्यापही बेस्टच्या ग्राहकांची सुटका झालेली नाही़ वाहतूक विभाग अद्यापही तोट्यात असल्याने बेस्टच्या वीज ग्राहकांना या अधिभाराचा शॉक पुढेही सहन करावा लागणार आहे. यापुढे या अधिभारातून सुटका करून घेण्यासाठी बेस्टच्या विभागीय कार्यालयात विनंती पत्र द्यावे, असा संदेश सोशल मीडियावरून गेल्या काही दिवसांपासून फिरत आहे.
या अधिभारातून आम्हाला वगळण्यात यावे, अशी विनंती केल्यास ग्राहकांची यातून सुटका होईल, असेही या संदेशात नमूद केले होते. त्यामुळे काही ग्राहकांनी बेस्टचे कार्यालय गाठले. परंतु असे संदेश म्हणजे निव्वळ अफवाच असल्याचा खुलासा बेस्ट अधिकाऱ्यांनी केल्याने ग्राहकांना हात हलवत परत यावे लागले. (प्रतिनिधी)