मुंबई : महावितरणच्या मुंबईस्थित प्रकाशगड मुख्यालयात सुरू करण्यात आलेल्या विशेष मदत कक्षामुळे ग्राहकांना नवीन वीजजोडणी तत्परतेने मिळत असून, ग्राहकांच्या नावातील बदलही करून देण्यात येत आहे. ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी हा कक्ष सुरू करण्यात आला असून, या कक्षाचा ग्राहकांनी जास्तीतजास्त उपयोग करून समस्यांचे निवारण या कक्षाद्वारे करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.एप्रिल २०१७पासून हा विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाकडे एप्रिल ते आॅक्टोबरच्या मध्यापर्यंत सुमारे १ हजार २०३ ग्राहकांनी संपर्क साधला असून, यातील ३७१ ग्राहकांनी नवीन वीज जोडणीच्या संबंधात चौकशी केली. त्यापैकी १२८ ग्राहकांना तत्परतेने नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. तसेच ८३२ ग्राहकांनी नावात बदल करण्याबाबत या विशेष कक्षाकडे मदत मागितली. त्यापैकी ५४ ग्राहकांच्या नावात तातडीने बदल करून देण्यात आला आहे.कक्षामार्फत आॅगस्ट २०१७पासून कनेक्शन आॅन कॉल ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेंतर्गत ज्या ग्राहकांनी वीजजोडणीसाठी या कक्षाला दूरध्वनी केला अशा ग्राहकांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन महावितरणने वीजजोडणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या सेवेंतर्गत ८३ ग्राहकांनी मदत कक्षाकडे संपर्क साधला. त्यातील ३६ ग्राहकांना नवीन वीजजोडणी तत्परतेने देण्यात आली आहे. ग्राहकांनी आपली तक्रार सोडविण्यासाठी महावितरण मुख्यालयातील विशेष कक्षाकडे संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
मदत कक्षाचा वीज ग्राहकांनी अधिकाधिक वापर करावा, महावितरणाचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 6:00 AM