लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वीज कंपन्या वीजग्राहकांसाठी व्हिडीओ काँटॅक्ट सेंटर सुरू करत आहेत. याद्वारे ७ लाख स्मार्ट मीटर्सचे नियोजन करता येणार आहे. ग्राहकांसाठी लवकरच स्मार्ट मीटरिंग सोल्युशन मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर लक्ष ठेवणे शक्य होईल. त्यायोगे ते विजेवरील खर्च कमी करू शकतील.
वीजग्राहक सेल्फ मीटर रीडिंग, ईमेल व एसएमएसद्वारे बिले प्राप्त करणे, वेबसाइटवर किंवा ॲपवर बिले बघणे यांसारख्या अनेकविध सेवा डिजिटल पर्यायांचा वापर करून उपलब्ध करून घेऊ लागले आहेत, अशी माहिती अदानी इलेक्ट्रिसिटीने दिली. वीज कंपन्यांचा आभासी (व्हर्च्युअल) संपर्क केंद्रे स्थापन करण्यावर भर आहे. मोबाइल किऑस्क ही व्यवस्था सुरू केली, जेणेकरून ग्राहकांना बिल भरण्यासाठी कन्झ्युमर केअर सेंटरमध्ये जावे लागू नये. ९० स्वयंसाहाय्यता किऑस्क मशिन्स बसवण्यात आल्या आहेत. ग्राहक सेल्फ हेल्प किऑस्कच्या माध्यमातून तक्रार नोंदवू शकतात. बिलाची डुप्लिकेट प्रत घेऊ शकतात. सुरक्षा अनामत रक्कम किंवा अन्य शुल्कही भरू शकतात.
वीजग्राहकांना एसएसएम/व्हॉट्सॲप किंवा एईएमएल वेबसाइटवरील चॅटबोट एलेक्ट्रा यांसारख्या विविध माध्यमांतून मीटर वाचन समजते. कस्टमर मोबाइल ॲप नवीन स्वरूपात लाँच केले. हे ॲप बिल भरण्यापासून ते नाव बदलासाठी अर्ज करण्यापर्यंत अनेकविध सुविधा देते. याद्वारे वीज वापराचा इतिहास तपासता येईल.