ग्राहकांना पुन्हा वीज दरवाढीचा फटका बसणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:06 AM2021-03-06T04:06:25+5:302021-03-06T04:06:25+5:30
वीजतज्ज्ञांचे मत : दर स्पर्धात्मक पातळीवर आणण्यासाठी गळती, वीज खरेदी खर्च कमी करा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एप्रिल ...
वीजतज्ज्ञांचे मत : दर स्पर्धात्मक पातळीवर आणण्यासाठी गळती, वीज खरेदी खर्च कमी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एप्रिल २०२२ नंतर महावितरण फेरआढावा याचिका दाखल करणार आहे. त्यामुळे २०२३-२४ व २०२४-२५ या २ वर्षांत राज्यातील सर्व वीज ग्राहकांना पुन्हा दरवाढीचा फटका बसणार हे निश्चित आहे, असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी सांगितले.
महावितरणच्या वीज दरामध्ये १ एप्रिल २०२० पासून सरासरी २ टक्के कपात म्हणजे अर्धसत्य आहे. काही वर्गवारीतील ग्राहकांच्या वीज दरामध्ये १ ते ४ टक्के घट होईल. तथापि, सर्व वीज ग्राहकांचा सरासरी देयक दर ७.२८ रुपये प्रति युनिट वरून ७.२६ रुपये प्रति युनिट होणार आहे. म्हणजेच सरासरी कपात २ पैसे प्रति युनिट म्हणजे ०.३ टक्के होणार आहे.
घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक व शेती पंप या सर्व वर्गांचे वीजदर देशात सर्वात जास्त आहेत. औद्योगिक वीजदर सभोवतालच्या सर्व राज्यांपेक्षा १० ते ४० टक्के जास्त आहेत. अशा परिस्थितीत केवळ ०.३ टक्के कपात म्हणजे काहीच नाही. वीजदर स्पर्धात्मक पातळीवर आणण्यासाठी प्रामुख्याने वीज गळती व वीज खरेदी खर्च कमी करणे आवश्यक आहे, तसेच प्रशासकीय खर्चात कपात केली पाहिजे, असेही होगाडे यांनी सांगितले. इंधन समायोजन आकार याचे अद्याप प्रमाणीकरण व निर्धारण व आकारणी झालेली नाही. ती झाल्यानंतरच कपात की वाढ हे चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
----------------------------