मुंबई : जेट एअरवेजचे विमान जर्मनवरून जात असताना त्याचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी काही काळ संपर्क तुटल्यामुळे याचे अपहरण झाल्याच्या शक्यतेने त्याला लढाऊ विमानांचे कवच देण्यात आले. तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या अभूतपूर्व घटनेत मुंबई-लंडन या ३३० प्रवासी व १५ चालक-कर्मचारी दलाला घेऊन जाणाऱ्या विमानाचा जर्मन हवाई हद्दीत कोलोन येथे काही काळासाठी संपर्क तुटला होता. दूरसंपर्क यंत्रणेत काही काळ बिघाड झाल्यामुळे बोइंग-७७७ च्या वैमानिकांचा संपर्क तुटला होता, असे जेट एअरवेजने रविवारी निवेदनात म्हटले आहे. तथापि, काही मिनिटांतच या विमानाची संपर्क यंत्रणा पूर्ववत झाली. विमान सुखरूप गंतव्यस्थळी पोहोचले. संबंधित वैमानिकांची चौकशी सुरू असून व याबाबत नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाला (डीजीसीए) माहिती देण्यात आली आहे. ९डब्ल्यू-११८ या मुंबईहून लंडन हिथ्रोकडे जाणाऱ्या विमानाबाबत हा प्रकार घडला. त्यावेळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जर्मन एअर फोर्सच्या लढाऊ विमानांनी जेट एअरवेजचे विमान व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कवच तयार केले होते, असे कंपनीने म्हटले आहे. तथापि, काही मिनिटांतच संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
संपर्क तुटलेल्या विमानाला दिले ‘लढाऊ’ कवच
By admin | Published: February 20, 2017 3:33 AM