मुंबई : जे.जे. रुग्णालयाच्या नेत्रचिकित्सा विभागातील तीन निवासी डॉक्टर काम करत नाहीत. त्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना त्रास झाला आहे. यासंदर्भात त्यांच्याविरुद्ध चौकशी समिती नेमली आहे. या चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी निवासी डॉक्टरांना एकत्र करून संपाचे हत्यार उगारल्याचे प्रतिपादन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी केले आहे. अधिष्ठाता डॉ. लहाने यांनी पुढे सांगितले, ‘विभागातील निवासी डॉक्टरांमुळे तीन रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. रुग्णांचा मधुमेह, रक्तदाब वाढला असतानाही त्यांना भूल दिली होती. त्यामध्ये एका रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला तातडीने कॉर्नरी केअर युनिट (सीसीयू)मध्ये दाखल करीत पेसमेकर बसवावा लागला. या बेफिकीरपणाबाबत चौकशी समिती नेमण्यात आली आहे. पण, हे निवासी डॉक्टर समितीपुढे आलेले नाहीत. त्याचप्रमाणे निवासी डॉक्टरांचा शस्त्रक्रिया करण्यास न देण्याचा आरोप चुकीचा आहे. नेत्र विभागात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करायला मिळत नाहीत, योग्य ती वागणूक मिळत नाही. दिवसाला १८ तास काम करावे लागते. त्यामुळे डॉ. लहाने आणि डॉ. पारेख यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी केली आहे. बदलीसाठी मास बंक आंदोलन पुकारण्याचा इशारा जे.जे. रुग्णालयातील मार्ड संघटनेने प्रसिद्धिपत्रकात दिला आहे. या मागणीसाठी भाजपाच्या नेत्या शायना एनसी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत व वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली होती. (प्रतिनिधी)आतापर्यंत १४ निवासी डॉक्टरांनी ७९० शस्त्रक्रिया केल्या आहेत. स्वतंत्रपणे २ हजार शस्त्रक्रिया तर ३ हजार शस्त्रक्रियांमध्ये साहाय्य करायची संधी दिली आहे. चौकशी टाळण्यासाठी त्यांच्याकडून संपाचा दबाव आणला जात असल्याचे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले.