शिक्षण थांबू नये म्हणून शाळांनी स्वतः साधला संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:05 AM2021-06-23T04:05:57+5:302021-06-23T04:05:57+5:30
लोकमत इम्पॅक्ट; सतरा नंबरचा अर्ज भरलेल्या मात्र मूळ गुणपत्रिका नसलेल्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना दिलासा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सहावीतच ...
लोकमत इम्पॅक्ट; सतरा नंबरचा अर्ज भरलेल्या मात्र मूळ गुणपत्रिका नसलेल्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सहावीतच शिक्षणापासून दूर झालेल्या हाशीम कुरेशी याने सतरा नंबरचा अर्ज भरला आणि यंदाच्या दहावीच्या परीक्षेसाठी बसला, मात्र यंदा अंतर्गत मूल्यमापनाच्या सूत्रानुसार त्याच्याजवळ सहावी इयत्तेची मूळ गुणपत्रिका असणे आवश्यक होते. जुनी शाळा बंद पडल्यामुळे गुणपत्रिका मिळविणे अशक्य हाेते. मात्र २० जून रोजी यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध हाेताच कुर्ला हायस्कूलच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी हाशिमशी स्वतः संपर्क साधून त्याला आपल्या रेकॉर्ड्समध्ये असलेली त्याची सहाव्या इयत्तेची गुणपत्रिका दिली. यामुळे आता केंद्राला त्याचा निकाल देणे शक्य होईल. हाशिमप्रमाणेच गौतम गायकवाड यालाही शाळेने संपर्क साधून त्याची गुणपित्रका दिली.
आर्थिक, सामाजिक परिस्थितीमुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेले अनेक विद्यार्थी १७ नंबरचा अर्ज भरून दहावी-बारावीच्या परीक्षा देतात आणि आपले शिक्षण पूर्ण करत असतात. यंदाच्या अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेमुळे या विद्यार्थ्यांच्या निकालावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एक तर हे विद्यार्थी संपर्कात नसल्याने शिक्षक, मुख्याध्यापकांना त्यांचा शोध घ्यावा लागत आहे, तर दुसरीकडे या विद्यार्थ्यांच्या मूळ गुणपत्रिका उपलब्ध नसल्याने त्यांचा निकाल तयार कसा करायचा, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यामधील अनेक विद्यार्थ्यांच्या मूळ शाळाच बंद पडल्याने मूळ गुणपत्रिका मिळवण्यात त्यांना अडचणी येत आहेत. अशाच विद्यार्थ्यांच्या समस्या ‘लोकमत’ने २० जून रोजीच्या बातमीत मांडल्या असता त्या विद्यार्थ्यांच्या शाळांनी त्यांना स्वतः संपर्क साधत त्यांना मूळ गुणपत्रिका सुपूर्द केल्या आहेत.
हाशिम कुरेशीप्रमाणेच गौतम गायकवाड याचीही शाळा बंद पडली होती. मात्र ‘लोकमत’च्या बातमीनंतर तेथील मुख्याध्यापकांनी त्याला शाळेच्या जुन्या इमारतीत बोलावून अभिलेखांमधून त्याचा निकाल मिळवून दिला. ‘लोकमत’मुळे आता आपण दहावी पास होणार असा आनंद त्याने प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.
* गुणपत्रिका मिळवून देण्यास मदत करावी!
अनेक केंद्रांना आणि तेथील मुख्याध्यपक, शिक्षकांना या विद्यार्थ्यांच्या मूळ गुणपत्रिका उपलब्ध नसल्याने निकाल बनविण्यात अडचणी येत आहेत. काही विद्यर्थ्यांना तर वारंवार फेऱ्या मारूनही निकाल मिळेनासे झाले आहेत. अशा शाळांनी या विद्यार्थ्यांना जुन्या गुणपत्रिका मिळवून देण्यात मदत करावी, त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ देऊ नये, असे आवाहन हाशिमसह गाैतमच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी केले आहे.