मधुकर ठाकूर, उरणउरण आणि जेएनपीटी परिसरात असलेल्या कंटेनर यार्डमध्ये ठेवण्यात येत असलेल्या पत्र्याच्या लाखो कंटेनरच्या डब्यांमुळे तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तापमान नियंत्रणात आणण्यासाठी आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येक कंटेनर यार्डमध्ये जागेच्या ३० टक्के जागेत झाडे लावण्याची आवश्यकता आहे. मात्र याकडे सिडकोच्या विविध विभागाकडून अक्षम्यपणे दुर्लक्षच होत असल्याने उरण परिसरात पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. उरण परिसरात जेएनपीटी, ओएनजीसी, नौदल, बीपीसीएल, जीटीपीएस यासारखे अनेक शासकीय प्रकल्प आहेत. या प्रकल्पावर आधारित अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या उभारण्यात आल्या आहेत. जेएनपीटी तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर आहे. बंदरातून वर्षाकाठी सरासरी ६० लाख कंटेनरची आयात निर्यात होते. प्रचंड नफ्यात चालणाऱ्या या आयात-निर्यातीच्या व्यापारात अनेक कंपन्या कार्यरत असून सुमारे ७०-८० गोदामे आहेत. परिसरात शासकीय प्रकल्पांवर आधारित अनेक रासायनिक आणि इतर कंपन्या आणि कंटेनर यार्ड उभारण्यात आले आहेत. कंटेनर यार्ड उभारणीसाठी माती, दगडाचे भराव टाकण्यात आले आहेत. या भरावामुळे डोंगर, टेकड्या आणि नैसर्गिक साधन सामग्रीची आहुती पडली आहे.दोन-चार वर्षांत जेएनपीटीचे चौथे बंदरही अस्तित्वात येणार आहे. यामुळे वर्षाकाठी एक कोटी कंटेनरची हाताळणी होणार आहे.उरण परिसरात सिडको प्लॅनिंग अॅथॉरिटी म्हणून काम पाहाते. त्यामुळे कंटेनर यार्ड उभारणीसाठी परवानगी देतानाच यार्डच्या एकूण क्षेत्रापैकी ३० टक्के जागेत टेंपरेचर कंट्रोल आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी ३० टक्के जागेवर वृक्ष लागवड आवश्यकता आहे. मात्र त्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे.
कंटेनर हिटमुळे तापले उरण
By admin | Published: June 10, 2015 10:39 PM