कंटेनर, तेलचोरांचा सुळसुळाट
By admin | Published: July 3, 2014 11:25 PM2014-07-03T23:25:25+5:302014-07-03T23:25:25+5:30
कंटेनर चोरी आणि विविध टँक फार्मच्या तेलवाहिन्यांतून होणारी तेल चोरी रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी सुचविलेल्या उपायांकडे प्रशासनाने मात्र सातत्याने दुर्लक्षच केल्याचे समोर आले आहे.
चिरनेर : उरणच्या जेएनपीटी बंदरातून आयात निर्यात होणारे कंटनेर ट्रेलर हे बंदर ते गोदाम या मधल्या रस्त्यातून गायब होण्याच्या शेकडो घटना घडलेल्या असतानाही कंटेनर चोरी आणि विविध टँक फार्मच्या तेलवाहिन्यांतून होणारी तेल चोरी रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी सुचविलेल्या उपायांकडे प्रशासनाने मात्र सातत्याने दुर्लक्षच केल्याचे समोर आले आहे.
तालुक्यात एकाही खाजगी अथवा सरकारी गोदामाच्या प्रवेशद्वारावर आणि मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नसल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. गुन्हे अन्वेषन विभागाच्या युनिट २ चे पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोणत्याही कंटेनर यार्डच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची तसदी गोदामांच्या प्रशासनाने घेतलेली नसल्याने त्यांनी सांगितले.
उरण तालुकाभरात जेएनपीटी आणि त्यावर आधारित इतर दोन बंदरांच्या अनुषंगाने हजारो कंटेनर ट्रेलरची ये - जा होत असते. याचा फायदा उचलत कंटेनरमधील माल चोरणाऱ्या टोळ्या परिसरात सक्रिय झाल्याचे मागील काही वर्षांतील विविध घटनांमधून स्पष्ट झाले आहे.
कंटेनर चोरीला जाण्याच्या अनेक गुन्ह्यातील आरोपी हे बऱ्याचदा ड्रायव्हर, क्लिनर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडील ड्रायव्हिंग लायसन्ससह आयात आणि निर्यातदार म्हणून समोर आलेली कंपनी खोटी असणे, वाहतूकदार कंपन्यांची आपल्याकडे ड्रायव्हर ठेवताना त्यांच्या वाहन परवाना खरा आहे की खोटा याची खातरजमा केलेली नसणे, ज्या गावांच्या परिसरात अशी कंटेनर गोदाम वसली आहे तेथील गावगुंडांचा यार्डमध्ये असणारा वावर, भंगार आणि कचऱ्याच्या निमित्ताने बाहेर जाणाऱ्या गाड्यांतून किमती मालाची होणारी चोरी आदी अनेक कारणे कंटेनर चोरीच्या प्रकरणाशी निगडित आहे. मात्र कोणत्याही कंटेनर यार्डसच्या प्रवेशद्वारावरून कं टेनर भरलेला ट्रक ट्रेलर बाहेर जाताना किंवा आत येताना त्याचे प्रवेशद्वारावर व्हिडिओ शूटिंग होवू शकेल अशा प्रकारची कोणतीही यंत्रणा एकाही कंटेनर यार्डने निर्माण केलेली नसल्याची माहिती पोळ यांनी दिली.
चोरीला जाणाऱ्या कंटेनरबाबत इन्सुरन्स असतो. त्यामुळे केवळ पोलीस केस करून इन्सुरन्सचे फायदे उचलायला मोकळे होत असल्याचे कस्टम, यार्डचे अधिकारी आणि कंत्राटदार, पोलीस आदिंची डोकेदुखी वाढत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. (वार्ताहर)