तळोजा : कळंबोलीत गेल्या दहा- बारा दिवसांपासून दुर्गंधीयुक्त दूषित पाणी मिळत असल्यामुळे येथील रहिवाशांवर आजारपण ओढावण्याची भीती निर्माण झाली आहे. कळंबोली परिसरातील सेक्टर ४, ५, ६ या वसाहतीमधील असलेल्या रहिवाशांना गेल्या १०-१२ दिवसांपासून हा त्रास होत आहे. मात्र पाणीपुरवठा विभागाच्या जलवाहिनींची दुरुस्ती होत असल्यामुळे कदाचित ही समस्या ओढावल्याचे रहिवासी सांगतात. या परिसरातील इमारती २५ वर्षे जुन्या असून या इमारतीमधील पाइपलाइन जीर्ण झालेली आहे व बहुतांशी पाइपलाइन या गटारातून गेल्या आहेत. त्यामुळे हे पाइप सडून यांना गळती लागली असल्याची शक्यता पाणीपुरवठा सहाय्यक अभियंता नवनीत सोनावणे यांनी सांगितली व यावर लवकरात लवकर उपाय केला जाईल असे ते म्हणाले. कळंबोली परिसरात येत असलेल्या दूषित पाण्याबद्दल अजून माझ्यापर्यंत काही आलेले नसून आमच्या विभागाकडून हा त्रास होत नसून या परिसरातील पाइपलाइप जुन्या व जीर्ण झाल्या असून त्यांना गळती लागली असल्यामुळे हा त्रास होत असावा. यावर लवकरात लवकर दखल घेतली जाईल अशी माहिती सोनावणे यांनी दिली. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई असताना हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त झाला.
कळंबोलीत दूषित दुर्गंधीयुक्त पाणी
By admin | Published: May 23, 2014 3:54 AM