तौक्ते चक्रीवादळाचा फटका
मनोहर कुंभेजकर
मुंबई - तौक्ते चक्रीवादळानंतर गोरेगाव पूर्व नागरी निवारा वसाहतीलगत असलेल्या न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीला दूषित पाणी पुरवठा होत असल्याने येथील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. १० ते १२ दिवस झाले तरी येथील दूषित पाणी पुरवठ्याची समस्या सोडवण्यात पी उत्तर वॉर्डच्या पाणी खात्याला यश आले नसल्याची नाराजी नागरिकांमध्ये आहे.
येथील नागरी निवारा परिषदच्या लगत असलेल्या न्यू दिंडोशी म्हाडा वसाहत इमारत क्रमांक १७ ते २८ तसेच म्हाडा बंगल्यात गेले १० ते १२ दिवस गढूळ पाणी येत असल्याची कैफियत न्यू दिंडोशी एकदंत सोसायटीचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी व सचिव समीर मसूरकर यांनी ‘लोकमत’कडे मांडली. सदर वसाहतीला होणाऱ्या गढूळ पाण्याची तक्रार पी उत्तर वॉर्डच्या पाणी खात्याकडे तसेच स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू आणि प्रभाग क्रमांक ४१चे नगरसेवक तुळशीराम शिंदे यांच्याकडे केली आहे.
येथील वसाहतीला होणाऱ्या गढूळ पाणीपुरवठा कोणत्या जागेतून होतो, याची शहानिशा करण्यासाठी पी उत्तर वॉर्डचे सहायक जल अभियंता प्रसाद जोशी यांनी ८ ते १० दिवसांपूर्वी येथे भेट दिली होती; मात्र अजूनही येथील वसाहतीला दूषित पाणी पुरवठा होत असल्याची माहिती सुभाष कुलकर्णी व समीर मसूरकर यांनी दिली. अनेक नागरिक पाणी उकळून पित असून, काही नागरिक तर नाइलाजास्तव बिसलरीचे पाणी विकत घेत आहेत, असे त्यांनी सांगितले.
तौक्ते चक्रीवादळाने भूगर्भाच्या रचनेत बदल होऊन जलवाहिनीला पडलेल्या बारीक छिद्रातून माती जात असेल आणि त्यामुळे दूषित पाणी पुरवठा या वसाहतीला होत असेल, अशी शंका येथील नागरिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
आधीच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट आणि आता पावसाळा तोंडावर आला असताना येथील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी येथील दूषित पाणी पुरवठ्याची समस्या पालिकेने लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
.....................................
.........................