न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीला होतोय दूषित पाणी पुरवठा; तौक्ते वादळाचा बसला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 07:09 PM2021-06-02T19:09:01+5:302021-06-02T19:09:06+5:30
दूषित पाणी पुरवठ्याची समस्या सोडवण्यात अजून तरी पी उत्तर वॉर्डच्या पाणी खात्याला यश आले नाही.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई: तौक्ते वादळा नंतर गोरेगाव पूर्व नागरी निवारा वसातीच्या लगत असलेल्या न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीला दूषित पाणी पुरवठा होत असल्याने येथील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.10 ते 12 दिवस झाले तरी येथील दूषित पाणी पुरवठ्याची समस्या सोडवण्यात अजून तरी पी उत्तर वॉर्डच्या पाणी खात्याला यश आले नाही.
येथील नागरी निवारा परिषदच्या लगत असलेल्या न्यू दिंडोशी म्हाडा वसाहत इमारत क्रमांक 17 ते 28 तसेच म्हाडा बंगल्यात गेले 10 ते 12 दिवस गढूळ पाणी येत आसल्याची कैफियत न्यू दिंडोशी एकदंत सोसायटीचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी व सचिव समीर मसूरकर यांनी लोकमतकडे मांडली. सदर वसाहतीला होणाऱ्या गढूळ पाण्याची तक्रार पी ऊत्तर वॉर्डच्या पाणी खात्याकडे तसेच स्थानिक आमदार,माजी महापौर सुनील प्रभू आणि प्रभाग क्रमांक 41चे नगरसेवक तुळशीराम शिंदे यांच्याकडे केली आहे.
येथील वसाहतीला होणाऱ्या गढूळ पाणी पुरवठा कोणत्या जागेतून होतो याची शहानिशा करण्यासाठी पी उत्तर वॉर्डचे सहाय्यक जल अभियंता प्रसाद जोशी यांनी 8 ते 10 दिवसांपूर्वी येथे भेट दिली होती. मात्र अजूनही येथील वसाहतीला दूषित पाणी पुरवठा होत असल्याची माहिती सुभाष कुलकर्णी व समीर मसूरकर यांनी दिली.अनेक नगरिक पाणी उकळून पीत असून काही नागरिक तर नाईलाजास्तव ब्लिसलरीचे पाणी विकत घेत आहे असे त्यांनी सांगितले.
तौक्ते वादळाने भूगर्भाच्या रचनेत बदल होऊन जल वाहिनिला पडलेल्या बारीक छिद्रातून माती जात असेल आणि त्यामुळे दूषित पाणी पुरवठा या वसाहतीला होत असेल अशी शंका येथील नागरिकांनी व्यक्त केली.आधीच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट आणि आता पावसाळा तोंडावर आला असतांना येथील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी येथील दूषित पाणी पुरवठ्याची समस्या पालिकेने लवकरात लवकर सोडवावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.