रेल्वे प्रवाशांना दूषित पाणी पुरवठा
By admin | Published: December 13, 2015 10:06 PM2015-12-13T22:06:07+5:302015-12-13T22:06:07+5:30
मडुरा स्थानकावरील स्थिती : प्रशासनाला आली उशिरा जाग ; साफसफाईचे संकेत
बांदा : प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या कोकण रेल्वेच्या मडुुरा स्थानकावर प्रवाशांना गढुळ व दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक प्रवाशांनी ही बाब कोरे प्रशासन व पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिली. या घटनेने कोरे प्रशासन व आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्याबरोबरच पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या विहिरीच्या सभोवतालची साफसफाई हाती घेण्याचे संकेत संबंधित प्रशासनाने दिले आहेत. कोरे प्रशासनाने दूषित पाणी पुरवठ्याद्वारे प्रवाशांच्या आरोग्याशी प्रतारणा केल्याचा आरोप प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील मडुरा हे महाराष्ट्रातील शेवटचे रेल्वेस्थानक आहे. या रेल्वे स्थानकावर नूतन प्रशासकीय इमारत, दुहेरी रेल्वे ट्रॅक, प्लॅटफॉर्म, वीज, पाणी, रस्ते या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या स्थानकार दिवा पॅसेंजर ट्रेनला नियमित थांबा आहे. तसेच गणेश चतुर्थी कालावधीत हॉलिडे गाड्यांना थांबा देण्यात येतो. प्रशासकीय इमारतीच्या बाजुलाच पाणीपुरवठा करण्यासाठी बोअरवेल खोदण्यात आली आहे. मात्र बोअरवेलमधून आवश्यक पाणीपुरवठा होत नसल्याने कोरे प्रशासनाने भाडेतत्वावर विहीर घेतली आहे.
अत्यंत अडगळीच्या ठिकाणी असलेल्या या विहिरीला कठडा नसल्याने पावसाळ्यात पठारावरील पाणी या विहिरीत जाते. विहिरीत रानटी प्राणी पडून कुजण्याचे प्रकारही वारंवार घडत असतात. शिवाय विहीर परिसराची साफसफाई केली जात नसल्याने पालापाचोळा विहिरीत पडून तो कुुजतो. विद्युत पंपाद्वारे पाणी थेट स्थानकावरील टाकीत सोडण्यात येते.
स्थानकावरील पाण्याची चव बदलल्याने प्रवाशांनी प्रत्यक्ष पाण्याची पाहणी केली असता हा दूषित पाण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विहिरीपर्यंत जाण्यासाठी असलेल्या मार्गावर मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले होते. याचा अर्थ पावसाळ्यापासून या विहिरीची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली नसल्याचे स्पष्ट झाले. पाण्यात टीसीएल पावडर मिसळणे तर दूरच, मात्र पंपाद्वारे थेट टाकीत पाणी सोडून ते प्रवाशांना पिण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येत
होते. (प्रतिनिधी)
मागणी : अहवाल मिळेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवा
मडुरा स्थानकावर बहुतांश वेळा क्रॉसिंगसाठी गाड्या थांबविण्यात येतात. त्यावेळी प्रवासी स्थानकावरील पाणी पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा करुन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या जीविताशी खेळ केल्याचा आरोप प्रवाशांमधून होत आहे. पाण्याच्या तपासणीचा अहवाल मिळेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.