ठाणे स्थानकात दूषित पाणीपुरवठा
By admin | Published: May 3, 2015 11:10 PM2015-05-03T23:10:01+5:302015-05-03T23:10:01+5:30
दिवसाला सात लाख प्रवाशांची वर्दळ असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकात होत असलेल्या दुषित पाणी पुरवठ्याबाबत खासदार राजन विचारे यांनी तीव्र
डोंबिवली : दिवसाला सात लाख प्रवाशांची वर्दळ असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकात होत असलेल्या दुषित पाणी पुरवठ्याबाबत खासदार राजन विचारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून स्टेशनात सर्वत्र शुद्ध पेयजल देण्यात यावे अशी मागणी केली आहे. तसेच टँकर लॉबीसोबत रेल्वे अधिका-यांचे काही साटेलोटे आहे का? असा सवाल करणारे पत्र मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना लिहून सत्य उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला आहे.
स्थानकात ११ फलाट असून दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात, त्यांच्यासाठी दिवसाला पाच लाख लिटर पाण्याची गरज आहे. मात्र ठाणे महापालिकेकडून त्यांना मिळणारा पाणीपुरवठा अपुरा आहे. गरज भागवण्यासाठी खाजगी टँकरद्वारे पाणी मागवून ते पाणी प्रवाशांसाठी दिले जाते. खाजगी टँकर हे बोअरवेल, विहिरी येथून प्रक्रिया न केलेले पाणी आणून रेल्वेच्या टाकीत टाकत असल्याचीही माहिती असल्याचे ते म्हणाले. रेल्वेतर्फे हेच पाणी शुद्धीकरणाची कोणतीही प्रक्रिया न करताच तसेच स्टेशनला पुरवले जाते. विशेष म्हणजे टँकरच्या कंत्राटदार लॉबीचे रेल्वे खात्यातील वर्चस्व मोडून काढण्यासाठी ठाणे महापालिकेकडून रेल्वेला जादा पाणी मंजूर करून घ्यावे अशी मागणी त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांकडे केली आहे. यासंदर्भात गांभीर्याने कार्यवाही न झाल्यास शिवसेनेच्या पद्धतीने रेल्वे प्रशासनाला धडा शिकविण्याचा इशाराही त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.