लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : हिंमत असेल तर तुम्ही विधानसभेच्या २८८ जागा लढवा आणि मग मागच्या दाराने, पुढच्या दाराने, छतावरून, छताखालून कुठूनही सभागृहात या. तुम्हाला जेथून यायचेय तेथून या, असे थेट आव्हान प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे-पाटील यांना दिले.
मराठा आरक्षणावरून सध्या जरांगे-पाटील आणि भाजप आमने-सामने आले आहेत. जरांगे यांनी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना मागच्या दाराने येणारे नेते पक्ष बुडवण्याचे काम करतात, असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देणारा व्हिडिओ लाड यांनी शनिवारी पोस्ट केला. त्यात ते म्हणतात, की आम्ही मागच्या दाराने आलो असेन किंवा पुढच्या दाराने आलो असेल. त्याच्याशी तुमचे काय? आमचा नाद करू नका. तुम्ही तुमचे काम करा, आम्हाला आमचे काम करू द्या.
आरक्षण दिले ही चूक होती काय?
मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले ही चूक होती काय?, न्यायालयात आरक्षण टिकवले ही चूक होती काय? असे सवालही लाड यांनी केले आहेत.