खेतवाडीत उंच उंच गणेशमूर्तीसाठी स्पर्धा; भव्य आणि आकर्षक गणपती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 03:08 PM2023-09-23T15:08:34+5:302023-09-23T15:09:00+5:30
एवढ्या चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये एवढे उंच गणपती कसे काय साकारले जातात हे पाहण्यासाठी मुंबईकरांनी येथे प्रचंड गर्दी आहे.
- श्रीकांत जाधव
मुंबई : उंच, भव्य आणि आकर्षक गणेश मूर्तीचे आव्हान स्वीकारात मुंबईकरांची गर्दी खेचणाऱ्या खेतवाडी गणेशोत्सवात यंदाही उंच उंच श्रीमूर्तीसाठी मंडळा मंडळात जोरदार स्पर्धा दिसते. त्यामुळे येथे ३५ फुट ते ४५ फुट उंचीपर्यंतच्या गणपती साकारण्यात आले आहेत. एवढ्या चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये एवढे उंच गणपती कसे काय साकारले जातात हे पाहण्यासाठी मुंबईकरांनी येथे प्रचंड गर्दी आहे.
खेतवाडी गिरगाव परिसरात भव्य मूर्ती पाहण्यासाठी मुंबईकर नेहमीची उत्सुक असतात. यंदाही गणेशभक्तांना उंच उंच गणेशमूर्ती पाहता येणार आहेत. १२व्या गल्लीत खेतवाडीचा गणराजाचे यंदा ६५ वर्ष आहे. त्यानिमित्त सुंदर असा महाल साकारण्यात आला आहे. १३ व्या गल्लीत राम अवतारात उंच आणि सुरेख मूर्ती आहे. १०व्या गल्लीत बाप्पा खेतवाडीचा मंडळाने समुद्र मंथनाचा भव्य देखावा उभा केला आहे.
ओम तांडव मंडळाने काचेचा सुंदर महाल आणि श्रीमूर्ती साकारली आहे. ९व्या गल्लीत खेतवाडीचा चिंतामणी आहे. ८व्या गल्लीत खेतवाडीचा महागणपतीचे हिरक महोत्सवी वर्ष आहे. येथेच बालाजी अवतार भव्य मूर्ती आहे. खंबाटा लेन खेतवाडीचा राजा आहे. तसेच ७ व्या गल्लीत खेतवाडीचा मोरया मंडळाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त मगरींवर आरूढ अशी भव्य श्रीमूर्ती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
४ थी गल्ली लंबोदर मुंबईचा सम्राट मंडळाने काचेचे सुदंर महाल उभारला आहे. ३ री क्रॉस लेन गल्लीत जय मल्हार अवतारात श्रीमूर्ती आहे. ५व्या गल्लीत खेतवाडीचा गणाधीश श्रीकृष्ण देखावा आहे. तर ४ थ्या गल्लीत इको फ्रेंडली खेतवाडी राजाने रायगड किल्ला उभारला आहे. तर ३ गल्लीत खेतवाडी विघ्हर्त्याने समुद्र मंथनाचा सुरेख देखावा साकारला आहे.
भगवान इंद्राच्या रुपात बाप्पा
गिरगाव खेतवाडी गणेशोत्सव मंडळाने भगवान इंद्राच्या रुपात यंदा मुंबईच्या महाराजाची गणेशमूर्ती घडवली आहे. भगवान इंद्र एका हातात 'वज्र' धारण उभे आहेत. तब्बल ४५ फुट उंच असलेली ही मूर्ती सर्वात उंच मूर्ती ठरली आहे. गेल्या वर्षी ३८ फुटाची मूर्ती येथे साकारण्यात आली होती. ही उंच मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. मूर्तिकार कुणाल पाटील यांनी ही मूर्ती घडवली आहे.