मानखुर्दच्या पोटनिवडणुकीत अटीतटीची लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 03:08 AM2019-12-28T03:08:24+5:302019-12-28T03:08:28+5:30
९ जानेवारीला होणार निवडणूक : काँग्रेस, शिवसेना आमने-सामने
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तरी पालिकेच्या पोटनिवडणुकीत मात्र काँग्रेस-शिवसेना आमने-सामने आहेत. मानखुर्द येथील प्रभाग क्र. १४१ चे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या जागेसाठी ९ जानेवारी २०२० रोजी निवडणूक होणार आहे.
शिवसेनेने पुन्हा एकदा लोकरे यांना या प्रभागात उमेदवारी दिल्याने काँग्रेसनेही आपला उमेदवार उभा केला आहे. त्याचबरोबर भाजप, समाजवादी, एमआयएम या पक्षांनीही आपले उमेदवार उभे केल्यामुळे ही लढत अटीतटीची होणार आहे. या पोटनिवडणुकीत आपले नशीब आजमावण्यासाठी एकूण २५ उमेदवारांनी अर्ज भरले होते. मात्र यापैकी आता १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेनेचे विठ्ठल लोकरे, भाजपचे बबलू पांचाळ, काँग्रेसचे काझी अल्ताफ महंमद, एमआयएमचे खान सद्दाम हुसेन इमाम ऊद्दिन, समाजवादीचे खान जमिर भोले, रिपब्लिकन सेनेचे संबोधी कांबळे आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अमोल क्षीरसागर या प्रमुख सात राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये ही लढत रंगणार आहे. यामध्ये ११ अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे.
राज्यात सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीने यापुढे सर्व निवडणुका आघाडी करून लढविण्याचे संकेत दिले होते. मात्र मुंबईत होत असलेल्या पहिल्याच पोटनिवडणुकीत शिवसेना, समाजवादी, काँग्रेस यांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात भिडणार आहेत. तर भाजपनेही या जागेवर दावा केल्याने माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांच्यासमोर पुन्हा नगरसेवकपद मिळविण्याचे मोठे आव्हान आहे. तसेच या पोटनिवडणुकीनंतर एप्रिल महिन्यात होणाऱ्या पालिकेच्या विविध समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस दावा करण्याची शक्यता आहे.