Join us  

आपत्ती निवारणासाठी तयारी सुरू

By admin | Published: May 24, 2014 1:46 AM

पावसाळ्यात कोणतीही आपत्ती ओढवू नये व एखादी घटना घडल्यास तत्काळ मदत उपलब्ध करता यावी यासाठी पालिकेने तयारी सुरू केली आहे.

नवी मुंबई : पावसाळ्यात कोणतीही आपत्ती ओढवू नये व एखादी घटना घडल्यास तत्काळ मदत उपलब्ध करता यावी यासाठी पालिकेने तयारी सुरू केली आहे. शहरातील सर्व शासकीय संस्था, पोलीस व निमशासकीय संस्थांची बैठक मुख्यालयात बोलावण्यात आली होती. सर्वांनी दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक आयुक्त आबासाहेब जºहाड यांनी बोलावली होती. यावेळी शहरात सर्व खोदकामे बंद करण्यात आली आहेत. साफसफाईची कामे पूर्ण होत आली आहेत. सार्वजनिक रूग्णालयात करण्यात आलेल्या व्यवस्थेची माहिती आयुक्तांनी दिली. बाजार समितीमध्ये पाणी साचून आरोग्यास धोका निर्माण होवू नये यासाठी संबंधित प्रशासनाने दक्षता घ्यावी. सायन-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाले काढण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या रोडवर पडलेले डेब्रिजही काढण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेने आपत्ती व्यवस्थापनासाठी केलेल्या उपाययोजनांचीही माहिती यावेळी देण्यात आली. पाणी साचण्याची व दरड कोसळणारी ठिकाणे शोधून संबंधितांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. एखादी दुर्घटना घडल्यास पर्यायी व्यवस्था करण्यात आली असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. यावेळी उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर, पोलीस उपआयुक्त विजय पाटील, उपप्रादेशिक अधिकारी संजय धायगुडे, प्रदूषण नियंत्रण मंडळ, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स, रेल्वे, एमआयडीसी व इतर आस्थापनांचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)