Join us

'उच्च शिक्षणात सातत्य आवश्यक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 5:16 AM

संशोधनातील महिलांचे प्रमाण वाढविण्यासाठी नीती कुमार यांचे मत

- सीमा महांगडे मुंबई : विज्ञान संशोधन क्षेत्र हे मुळातच खूप मोठे आणि विस्तृत आहे. मुली आणि महिलांचा त्यातील सहभाग वाढविण्यासाठी आधी त्यांनी त्यांचे उच्च शिक्षणातील सातत्य राखणे हा महत्त्वाचा निकष आहे, असे मत सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग रिसर्च हबच्या (सर्ब) २०२० वर्षाच्या उत्कृष्ट महिला पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ संशोधिका डॉ. नीती कुमार यांनी व्यक्त केले.युनेस्कोच्या २०१८ च्या अहवालानुसार, जगभरातील वैज्ञानिक संस्थांमध्ये कार्यरत पूर्णवेळ व अंशकालीन संशोधकांमध्ये महिलांचे प्रमाण २८.४ टक्के आहे. महिला आणि मुलींचा विज्ञान संशोधन क्षेत्रातील टक्का वाढविण्यासाठी पालकांनाच विज्ञानातील, संशोधनातील विविध करिअरविषयक पर्यायांची माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे मुलींना आवडत्या क्षेत्रातील संशोधनात सातत्य राखता येईल, असे डॉ. कुमार यांनी सांगितले.विज्ञान संशोधन क्षेत्र हे मुळातच खूप मोठे आणि विस्तृत आहे. मुली आणि महिलांचा त्यातील सहभाग वाढविण्यासाठी आधी त्यांनी त्यांचे उच्च शिक्षणातील सातत्य राखणे हा महत्त्वाचा निकष आहे. विज्ञान क्षेत्रात तुम्ही पूर्ण वेळ संशोधनच करायला हवे असे सक्तीचे नाही, तर विज्ञान आणि कला, विज्ञान संवाद, विज्ञान कार्यशाळा, विज्ञान माहितीपट अशा विज्ञानातील विभिन्न पर्यायांचा विचार व्यवसाय किंवा पुढील कारकिर्दीसाठी करण्यास हरकत नाही. मात्र वरील पर्यायांचा नोकरी म्हणून कसा उपयोग होईल याचाही विचार होणे आवश्यक आहे. या अशा विभिन्न पर्यायांमधून अनेक प्रकारचे मूल्यवर्धित काम होऊ शकते, अशी प्रतिक्रिया कुमार यांनी दिली.विज्ञानाचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी शालेय जीवनापासूनच त्यांना पडलेले प्रश्न विचारण्याची मुभा द्यायला हवी. प्रश्न पडल्याशिवाय संशोधनाला चालना मिळत नाही. तथ्यपूर्ण आणि तर्कशुद्ध कारणांद्वारे त्यांच्यामधील सुदृढ संवादाला प्रोत्साहन द्यायला हवे, जेणेकरून विज्ञानाची जिज्ञासा त्यांच्यामध्ये उत्पन्न होईल. याचा उपयोग म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला समाज आपल्या सर्वांना पाहायला मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.‘वुमन इन सायन्स’वर व्यक्त केली मतेसीएसआयआर-सीडीआयआरच्या लखनऊमध्ये मॉल्युक्युलर पॅरासिटोलॉजी अ‍ॅण्ड इम्म्युनॉलॉजी विभागात कार्यरत असणाऱ्या नीती कुमार यांना यंदाचा सर्बचा ‘उत्कृष्ट महिला’ पुरस्कार मिळाला. ‘लोकमत’ने त्यांच्याशी राष्टÑीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने संवाद साधला असता त्यांनी यंदाच्या ‘वुमन इन सायन्स’ या विज्ञान दिनाच्या थीमवर आपली मते व्यक्त केली.