चैत्यभूमीवर तेवत राहणार अखंड भीम ज्योत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 05:48 AM2018-08-29T05:48:27+5:302018-08-29T05:49:04+5:30
सामाजिक न्याय विभागाचा हिरवा कंदील
मुंबई : दादर चैत्यभूमीजवळील अशोक स्तंभाजवळ अखंड तेवत राहणारी भीम ज्योत उभारली जाणार आहे़ सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी नुकतीच या जागेची पाहणी केली असून, वित्त खात्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर या ज्योतीचे काम सुरू होणार आहे़
चैत्यभूमी येथे भीम ज्योत असावी, अशी मागणी नायगाव येथील माजी नगरसेविका पल्लवी मुणगेकर यांनी महापालिका सभेत २० मार्च, २०१६ रोजी केली होती़ त्याला मंजुरी मिळाली़ मात्र, त्यानंतर प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाचा पाठपुरावा स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी केला. अखेर सामाजिक न्यायमंत्र्यांकडूनही हिरवा कंदील मिळाल्याने, अखंड भीम ज्योत उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शशिकांत बर्वे यांनी दिली. बर्वे म्हणाले की, सामाजिक न्यायमंत्र्यांसोबत अखंड भीम ज्योतसाठी जागेची पाहणी केली़ एकमताने अशोक स्तंभाजवळील जागा निश्चित झाली आहे़ चैत्यभूमीला दररोज शेकडो अनुयायी भेट देतात़ ६ डिसेंबरला येथे देशभरातून अनुयायी येतात़ या ठिकाणी अखंड भीम ज्योत असावी, अशी असंख्य अनुयायांची इच्छा होती़ सामाजिक न्यायमंत्र्यांनी भीम ज्योत उभारण्याची ग्वाही दिल्याने आंबेडकरी अनुयायांसाठी नक्कीच ही सुखद बातमी आहे, असेही बर्वे म्हणाले.