मच्छीमारातील संघर्षावर हवी कायम उपाययोजना
By admin | Published: November 19, 2014 11:17 PM2014-11-19T23:17:40+5:302014-11-19T23:17:40+5:30
खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांमधील संघर्ष जिल्ह्याला नवीन नाही. यापूर्वीही सागरी हद्दीवरून वसई व पालघर तालुक्यांतील मच्छीमारांमध्ये अनेकदा हाणामाऱ्या झाल्या आहेत.
दीपक मोहिते, वसई
खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांमधील संघर्ष जिल्ह्याला नवीन नाही. यापूर्वीही सागरी हद्दीवरून वसई व पालघर तालुक्यांतील मच्छीमारांमध्ये अनेकदा हाणामाऱ्या झाल्या आहेत. अनेक वर्षांपासून हा संघर्ष सुरू आहे. परंतु, तो मिटवण्यासंदर्भात राज्य शासनाच्या मत्स्य व बंदर विभागांनी कधीही पावले उचलली नाहीत. अनेकदा गुजरातमधील मच्छीमारांसमवेतही हद्दीवरून वाद निर्माण झाले होते. याप्रश्नी कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास समुद्रामध्ये हिंसक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
उत्तन ते थेट गुजरात परिसरातील मच्छीमार खोल समुद्रामध्ये मासेमारी करीत असतात. परंतु, गेल्या काही वर्षांत वसई, उत्तन, डहाणू व गुजरातमधील मच्छीमारांमध्ये विविध प्रश्नांवरून सतत संघर्ष निर्माण होत आहे. काही वर्षांपूर्वी हा संघर्ष पराकोटीला गेल्यानंतर तत्कालीन पालकमंत्र्यांनी याप्रश्नी संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मच्छीमारांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले, परंतु त्यानंतरही काही किरकोळ घटना अधूनमधून घडतच आहेत. दोन दिवसांपूर्वी उत्तन व सातपाटीमधील मच्छीमारांमध्ये जोरदार हाणामाऱ्या झाल्या. या घटनेत सातपाटीतील काही मच्छीमारांना मारहाण करण्यात आली. समुद्रातील हे संघर्षाचे वातावरण निवळावे,
याकरिता बंदर, कस्टम व मत्स्य व्यवसाय विभागाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. अन्यथा, हा वाद विकोपाला जाऊन त्यास हिंसक वळण मिळण्याची दाट शक्यता आहे.
मासेमारी करण्यासाठी आखून दिलेल्या हद्दीबाहेर मासेमारी करणाऱ्या मासेमारी बोटींना मज्जाव करण्याकरिता शासनाने यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. यापूर्वीही अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती. परंतु, त्या दृष्टीने कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे अधूनमधून समुद्रात अशा प्रकारचे संघर्ष उद्भवत असतात.