वांद्रे-वर्सोवा सी-लिंकचे कंत्राट अनिल अंबानींच्या रिलायन्सला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 03:48 AM2019-06-28T03:48:43+5:302019-06-28T03:49:17+5:30
वांद्रे ते वर्सोवा सी-लिंक बांधणीचे काम अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळाले आहे.
मुंबई - वांद्रे ते वर्सोवा सी-लिंक बांधणीचे काम अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळाले आहे. हा प्रकल्प ७ हजार कोटी रुपयांचा असून, हे काम पाच वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. या सागरी सेतूमुळे वांद्रे वे वर्सोवा हे अंतर अवघ्या १0 मिनिटांत पूर्ण करता येईल. सध्या या प्रवासाला दीड तास लागतो.
हा सागरी सेतू १७.१७ किलोमीटर लांबीचा असेल. वरळी ते वांद्रे सागरी सेतू आधीच बांधून झाला असून, तो ५.६ किलोमीटर लांबीचा आहे. त्याच सागरी सेतूच्या वांद्रे टोकाकडून अंधेरीच्या वर्सोव्यापर्यंतचे बांधकाम प्रामुख्याने समुद्रातच होणार आहे. रिलायन्स इन्फ्रा व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंहामंडळ यांच्यात या सागरी सेतू बांधणीचा करार २४ जून रोजी झाला. त्या तारखेपासून पाच वर्षांत हे बांधकाम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने पूर्ण करायचे आहे.
अनिल अंबानी यांच्या कंपन्या सध्या आर्थिक अडचणीत असून, त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भावही सातत्याने घसरत आहेत. त्यातच एरिक्सनचे देणे देण्यासाठी अनिल अंबानी यांना त्यांचे बंधू मुकेश अंबानी यांना अर्थसाह्य केले होते. वांद्रे ते वरळी सागरी सेतूचे काम हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने केले होते. तो प्रकल्प पूर्ण व्हायला तब्बल ९ वर्षे लागली होती. या सागरी सेतूमुळे वांद्रे ते वरळी हे अंतर चार ते पाच मिनिटांत पूर्ण करता येते.