Join us  

कंत्राटी सफाई कामगार वाऱ्यावरच ! मानवाधिकार आयोगाने शहर जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून पुन्हा अहवाल मागविला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 11:46 AM

शहरात सध्या छोट्या नाल्यांची सफाई आणि गाळ काढण्याची कामे सुरू आहेत.

मुंबई : शहरात सध्या छोट्या नाल्यांची सफाई आणि गाळ काढण्याची कामे सुरू आहेत. सफाई कामगारांकडून हातानेच नाले आणि गटारे साफ करून घेण्याचे प्रकरण समोर आल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून शहर जिल्हा दंडाधिकारी यांना या प्रकरणी कारवाईच्या सूचना दिल्या. या प्रकरणासंदर्भात तपशीलवार अहवाल आणि काय कारवाई केली, याचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, संबंधित प्राधिकरणाकडून कोणताही अहवाल प्राप्त झालेला नसल्याने शेवटी पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांना अंतिम स्मरणपत्र दिले आहे. त्यामुळे अद्यापही कंत्राटी सफाई कामगारांची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे चित्र आहे.

शहरात अनेक ठिकाणी सफाई कामगारांना नाल्यांत उतरवून त्यांच्याकडून हाताने मैला साफ करून घेत असल्याचे निदर्शनास आले. या कामगारांना हॅण्डग्लोव्हज, मास्क, गमबूट आदी सुरक्षा साधने पुरवण्यात येत नाहीत. मागील महिन्यात गोवंडीत शिवाजीनगर बस डेपोच्या बाजूला खासगी कंत्राटदाराकडून मलनि:सारण वाहिनीची साफसफाई सुरू असताना मॅनहोलमध्ये उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला. 

मात्र, महापालिकेकडून या ठेकेदारावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे महापालिका व ठेकेदार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या कायद्याचे उल्लंघन करीत असल्याने कारवाई करण्याची मागणी फैयाज शेख यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग कायदा विभागाकडे केली होती. याप्रकरणी आयोगाने तक्रारीची दखल घेत संबंधित जिल्हा दंडाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून चार आठवड्यांत अहवाल मागितला होता.

सुरक्षा साधने न देता कामगारांकडून साफसफाई करून घेणे हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नियमानुसार उल्लंघन आहे. पालिका व ठेकेदार हे निष्पाप जिवांशी खेळत आहेत. अशा पालिका अधिकारी व ठेकेदारांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे याबाबतचा कारवाईचा अहवाल सादर न केल्यास आयोगाने आवश्यक कार्यवाही करावी.- फैयाज आलम शेख, अध्यक्ष, गोवंडी न्यू संगम वेल्फेअर सोसायटी