Join us

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीला ‘ग्रहण’, संपाचा चौथा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 6:25 AM

मुंबईकरांना वाहतुकीची सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील १,८०० बस भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत.

मुंबई : ऐन दिवाळीत बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारून मुंबईकरांना वेठीस धरले असून मरोळ, दिंडोशी आगारातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारीही संप सुरूच ठेवला आहे. याप्रकरणी हंसा प्रा. लि. कंपनीने ४०० पेक्षा जास्त कामगारांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून या प्रकरणी ४८ तासांत खुलासा करण्यास संपकऱ्यांना सांगितले आहे. असे असले तरी संप केव्हा मिटणार, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.मुंबईकरांना वाहतुकीची सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील १,८०० बस भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. हंसा सिटी बस सव्हिर्सेस प्रायव्हेट लिमिटेड, मातेश्वरी कंपनी, डागा या तीन कंपन्यांना  भाडेतत्त्वावर या बस चालवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी सांताक्रूझ, प्रतीक्षानगर, मजास आगारातील मातेश्वरी कंपनीच्या चालक व वाहकांनी शनिवारी आणि रविवारी दोन दिवस काम बंद आंदोलन केले तर सोमवारी समान काम, समान वेतन व इतर प्रलंबित मागण्यांसाठी हंसा कंपनीच्या दिंडोशी, मरोळ येथील कर्मचाऱ्यांनी  संप पुकारला. दिंडोशी येथील आगारातील २५० कामगार, तर मरोळ आगारातील ३५० कामगार संपावर गेले. त्यामुळे १६६ बस आगारातच उभ्या होत्या. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे बेस्टचे तसेच कंपनीचे नुकसान झाल्याने कंपनीने कर्मचाऱ्यांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

कामावर रुजू व्हा, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई मे हंसा सिटी बस सर्विसेस (मुंबई) प्रा. लि. या कंपनीमधील बसचालक आणि वाचकांनी संप पुकारल्याने ऐन दिवाळीत बेस्ट तसेच प्रवाशांचे नुकसान केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई का करू नये अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली असून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :बेस्टमुंबई