रस्त्यांच्या कामांसाठी ६ ते १० टक्के वाढीव दराने कंत्राट; मुंबई महापालिकेचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 01:31 AM2020-01-14T01:31:43+5:302020-01-14T01:32:21+5:30

अंदाजित रकमेपेक्षा अधिक खर्च : ११८ कोटींचा खर्च

Contract at an increased rate of 3 to 5 percent for road works | रस्त्यांच्या कामांसाठी ६ ते १० टक्के वाढीव दराने कंत्राट; मुंबई महापालिकेचे नुकसान

रस्त्यांच्या कामांसाठी ६ ते १० टक्के वाढीव दराने कंत्राट; मुंबई महापालिकेचे नुकसान

Next

मुंबई : पावसाळ्याला चार महिने उरले असताना पालिका प्रशासनाने मुंबईत मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. पश्चिम उपनगरातील तब्बल ११८ कोटींच्या कामांचे कंत्राट देण्यात येणार आहे. मात्र या कामांसाठी अंदाजित खर्चाच्या रकमेपेक्षा ६ ते १० टक्के अधिक रक्कम खर्च करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. यावर विरोधी पक्ष आक्षेप घेण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका असल्याने पालिकेची विकासकामे आचारसंहितेच्या कात्रीत सापडली होती. याचा मोठा फटका रस्त्यांच्या कामांना बसला आहे. दरवर्षी १ आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रस्त्याच्या कामांची निविदा प्रक्रिया लांबणीवर पडली. त्यानंतर आयुक्तांनी कंत्राट नियमात बदल केल्यामुळे रस्त्यांची कामे आणखी काही काळ रेंगाळली होती. या विलंबाचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले होते.

यावर्षी मुंबईकरांना चांगले रस्ते तयार करून मिळणार नाहीत, अशी नाराजी विरोधी पक्षांनी व्यक्त केली होती. त्यामुळे पुढच्या बैठकीत रस्त्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले होते. त्यानुसार पश्चिम उपनगरातील पाच वॉर्डमधील रस्त्यांची सुमारे ११८ कोटींची कामे केली जाणार आहेत. रस्त्यांची कामे ‘६०:४०’ फॉर्म्युल्यानुसारच देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

अशी असतील विविध कामे

  • आर/मध्य - सिमेंट काँक्रिट रोडवरील तुटलेले पॅनेट, लगतच्या पट्ट्या, फुटपाथचे काँक्रिटीकरण - ४० कोटी ३८ लाख ७७ हजार ९६१ रुपये.
  • पी-दक्षिण - विविध रस्त्यांचे सिंमेट काँक्रिटीकरण - २० कोटी ०५ लाख ४२ हजार ६०७ रुपये.
  • आर-दक्षिण - स्वयंभू गणेश मंदिर रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण - ४ कोटी ९८ लाख ३२ हजार ४१७ रुपये.
  • पी-उत्तर - लिंक रोड, मालाड पश्चिम येथील रस्त्यालगतच्या पट्ट्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण ४६ कोटी ८१ लाग ६० हजार ५५४ रुपये खर्च.
  • आर/मध्य - विविध रस्त्यांचे सिंमेट काँक्रिटीकरण, पॅसेजचे काँक्रिटीकरण ५ कोटी ८० लाख ६० हजार ५०२ रुपये खर्च.
  • रस्त्यांची कामे झाल्यानंतर निर्धारित हमी कालावधीत पाच वर्षांपर्यंत देखभाल करण्याची जबाबदारी ही संबंधित ठेकेदाराची असते. मात्र अनेक वेळा काम झाल्यानंतर ठेकेदार रस्त्याची डागडुजी, खड्डे बुजवणे या कामांकडे दुर्लक्ष करतात.
  • यापुढे रस्त्यांची कामे ६०:४० फॉर्म्युल्यानुसार देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यामध्ये ठेकेदाराला काम पूर्ण झाल्यानंतर ६० टक्के रक्कमच देण्यात येईल.
  • उर्वरित ४० टक्के रक्कम कामाचा हमी कालावधी पूर्ण झाल्यानंतरच देण्यात येईल. याआधी हमी कालावधीपर्यंत २० टक्के रक्कम मागे ठेवली जात होती.

Web Title: Contract at an increased rate of 3 to 5 percent for road works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.