Join us

क्रॉफर्ड पार्किंगचे कंत्राट सव्वा तीन कोटींचे; महापालिकेची निविदा प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 9:51 AM

घसघशीत महसूल मिळण्याचा अंदाज.

मुंबई : क्रॉफर्ड मार्केट पार्किंग लॉटमध्ये   ठरलेल्या शुल्कापेक्षा जास्त दर आकारून मुंबईकरांची लूटमार करणाऱ्या  सदाफुले बचत गटाचे कंत्राट रद्द झाले आहे. आता या ठिकाणी नवीन कंत्राट देण्यासाठी मुंबई पालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या लॉटमधील कंत्राट तब्बल ३ कोटी २३ लाख ७१ हजार रुपयांचे आहे. त्यावरून लॉटमधून किती घसघशीत महसूल मिळतो  याचा अंदाज येईल. कंत्राटाच्या मोबदल्यात एवढा  महसूल कंत्राटदाराने पालिकेला द्यायचा आहे. त्यानंतर जो काही महसूल जमा होईल, त्याचा लाभार्थी तो असेल. 

क्रॉफर्ड मार्केटमध्ये  तीन पार्किंग लॉट असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया आहे. ही  निविदा महिला बचत गटासाठी आहे.  याच वॉर्डातील शिवसागर राम  गुलाम मार्ग येथे  स्टील पे अँड पार्क योजना चालवण्यासाठी ३० लाख ८५ हजार २९६ रुपयांची निविदा आहे. तर, नरोत्तम मोरारजी मार्ग येथील पार्किंगची निविदा ७६ लाख ८ हजार ३१२ रुपयांची आहे. 

ज्याची जास्त बोली त्याला कंत्राट:

 पालिकेने काढलेल्या निविदेत जो आकडा नमूद करण्यात आला आहे. तेवढा महसूल पालिकेला दोन वर्षात अपेक्षित आहे. जास्त बोली लावणाऱ्याला कंत्राट मिळू शकते. 

 पालिकेच्या अन्य निविदांमध्ये कमी किमतीची निविदा मंजूर केली जाते. (उदा. विविध प्रकल्पांची किंवा अन्य कामे  कामे कमी दरात करून देणारे  कंत्राटदार)  मात्र पार्किंगच्या कंत्राटात जास्त बोलीची निविदा सर्वसाधारणपणे मंजूर होते. 

पार्किंग हा कळीचा मुद्दा:

 क्रॉफर्ड मार्केट हा मुंबईचा अत्यंत वर्दळीचा  विभाग आहे. क्रॉफर्ड मार्केट, मनीष मार्केट, मंगलदास मार्केट ही व्यापाराची मोठी केंद्रे या परिसरात आहेत. 

येथे येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग हा कळीचा मुद्दा आहे. वाहनांची संख्या आणि पार्किंग लॉटचे व्यस्त प्रमाण पाहता या भागात पार्किंग मिळणे जिकिरीचे असते. त्यामुळे येथील पार्किंग स्लॉटला महत्त्व आहे. 

काही ठिकाणच्या पार्किंग स्लॉटमधून मिळणार महसूल:

७५ लाख- मॅथ्यू स्ट्रीट  

४५ लाख- जे. एन. हार्डिया मार्ग

१२ लाख- काशिनाथ धुरू मार्ग, प्रभादेवी 

३४ लाख-  दत्ता भट मार्ग विलेपार्ले  

१९ लाख-  नगिनदास मास्टर मार्ग, सँडहर्स्ट रोड  

४१ लॉट कंत्राटदारांना

मुंबईत पालिकेचे ९१ पार्किंग लॉट असून त्यापैकी ५० स्लॉटचे व्यवस्थापन पालिका करते, तर ४१ लॉट कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. पार्किंगची काही कंत्राटे महिला बचत गटांना देण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वीच पालिकेने घेतला. त्यानुसार आता काही कंत्राटे या बचत गटांना देण्यात येत असल्याचे समजते. 

टॅग्स :नगर पालिकापार्किंग