कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना लाेकलमध्ये प्रवेश मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:06 AM2021-05-01T04:06:34+5:302021-05-01T04:06:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाेकल प्रवास करण्यास परवानगी नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाेकल प्रवास करण्यास परवानगी नाही. त्यांची सेवाही अत्यावश्यकच असल्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातून मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीने रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने केली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वे प्रवासाला परवानगी दिली आहे. वीज कंपन्यांतील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत असतानाही कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासासाठी परवानगी दिलेली नाही. वीज कंपन्यांची कार्यालये वांद्रे, मंत्रालय आणि फोर्ट परिसरात आहेत. या कार्यालयांमध्ये सुमारे ६०० कंत्राटी कर्मचारी आहेत. ते विविध भागातून येतात. या कामगारांच्या ओळखपत्रावर वीज कंपन्यांनी नॉन एम्प्लॉय असा उल्लेख केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना तिकीट देण्यात येत नसल्याचे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने सांगितले. ओळखपत्रावर असलेला उल्लेख बदलून बाह्यस्रोत कर्मचारी असा बदल केल्यास रेल्वे प्रवासाची मुभा मिळेल, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
* याेजनेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ
कोरोना काळात कर्तव्यावर असणाऱ्या महावितरणमधील अधिकारी, कर्मचारी तसेच बाह्यस्रोत कामगार आणि सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
.......................