कंत्राटी भरतीचा निर्णय अखेर रद्द; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 06:30 AM2023-10-21T06:30:33+5:302023-10-21T06:30:44+5:30
ठाकरे, शरद पवारांचे पाप आम्ही संपविले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘कंत्राटी भरतीचे पाप हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि शरद पवार त्यांचे मार्गदर्शक असतानाचे आहे, त्या पापाचे ओझे आम्ही उचलणार नाही. त्यामुळेच नऊ कंपन्यांमार्फत सरकारी कंत्राटी भरती करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे,’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती करून सरकारच्या माध्यमातून भरती करण्याच्या पद्धतीला फाटा देणारा आणि आरक्षणाला खो देणारा हा निर्णय अखेर रद्द झाला. फडणवीस म्हणाले की, या भरतीविरुद्ध आज ओरड करत असलेले उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांचा गट आणि काँग्रेस यांची राज्यात सत्ता असतानाच या भरतीचा निर्णय झालेला होता.
यापूर्वी आघाडी सरकारच्या काळात सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात ही हजारो कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कधी कधी भरण्यात आले, त्याचे आदेश कोणत्या तारखांना निघाले याची आकडेवारीच फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. विविध शासकीय विभागांमध्ये त्यांच्या पातळीवर सहा महिने, वर्षभरासाठी कंत्राटी भरती केली जाते ती सुरू राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरे, पवारांनी माफी मागावी
आता जो विषय सुरु झाला, ती संपूर्ण प्रक्रिया, सप्टेंबर २०२१ पासून सुरू झाली. त्याला २३ मे २०२२ रोजी वित्त विभागाने मान्यता दिली.
महाराष्ट्रात कंत्राटी भरतीसाठी जे दोषी आहेत, तेच गदारोळ करीत आहेत. आम्ही रद्द करत असलेल्या कंत्राटी भरतीचे १०० टक्के पाप हे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचेच आहे.
आता त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, त्यांनी ती न मागितल्यास आम्ही त्यांना जनतेत उघडे पाडू असे फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई पोलिस दलात कंत्राटी भरती नाही
nमुंबई पोलिस दलात कंत्राटी भरती नाही. नियमित पोलिस भरती सुरु असून राज्यात १८ हजार ३३१ पोलिस नियमित सेवेत घेतले आहेत. n७ हजार मुंबईसाठी आहेत, पण आणखी मनुष्यबळ तातडीने लागते म्हणून नियमित भरती होईपर्यंत ३ हजार पोलिसांची सेवा राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेत आहोत.