अदानी कंपनीचे कंत्राटी कामगार बेमुदत संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 02:50 AM2019-02-19T02:50:10+5:302019-02-19T02:50:37+5:30
अदानी या वीज कंपनीतील स्थायी आणि कंत्राटी कामगारंच्या मागणी पत्रावर तत्कालीन रिलायन्सने १६ सप्टेंबर २०१६ रोजी मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनसोबत करार केला.
मुंबई : अदानी कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेत नसल्याने अखेर कंत्राटी कामगारांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनसोबत करण्यात आलेल्या करारातील प्रश्नांची अंमलबजावणी दोन महिन्यांत केली जाईल, असे लेखी आश्वासन अदानीने १ सप्टेंबर २०१८ रोजी दिले होते. अदानीने हे आश्वासन पाळले नाही. उलटपक्षी कंपनीने दिरंगाईचे धोरण अवलंबिले. त्याविरोधात हा संप आहे़
अदानी या वीज कंपनीतील स्थायी आणि कंत्राटी कामगारंच्या मागणी पत्रावर तत्कालीन रिलायन्सने १६ सप्टेंबर २०१६ रोजी मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनसोबत करार केला. कामगार आयुक्त कार्यालयात कराराची नोंद करण्यात आली. करारामध्ये व्यवस्थापनाने ज्या मागण्या मान्य केल्या त्यामध्ये कंत्राटी कामगारांना कायम पदावर सामावून घेणे, कामगारांच्या मुलामुलींना कंपनीच्या नोकरीमध्ये समावून घेणे, अपघात व नैसर्गिक कारणाने मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना नोकरीमध्ये समावून घेणे, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कामगारांना कंपनीमध्ये समावून घेणे, आरएचआरएस व जीआयएससह माहिती तंत्रज्ञान विभागात काम करत असलेल्या हंगामी कामगारांना कंपनीत समावून घेणे, पॉवर लॉस भत्त्याची पुनर्रचना करणे, पदोन्नती धोरण ठरविणे, प्रत्येक महिन्याच्या दुसरा आणि चौथा शनिवारी सुट्टी घेणे, रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेणे, कामगारांच्या घरकुल योजनेस २ लाख ७५ हजार चौरस मीटर जागा मिळवून देणे, हॉलिडे रिसोर्ट उभारणे, चिल्ड्रन्स डे सुरु करणे, बिल डिस्ट्रीब्युटर व इतर कंत्राटी कामगारांना किमान वेतन प्रदान करणे; याचा समावेश आहे.
कंपनीकडून अद्याप याप्रश्नी काहीच ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. परिणामी २१ डिसेंबर २०१८ रोजी कामगारांनी कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. कामगार आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचे कंपनी पालन करत नसल्याने कामगारांनी सहा दिवस जागर आंदोलन छेडले.कामगारांनी ७ फेब्रूवारी २०१९ पासून नियमाप्रमाणे काम आंदोलन सुरु केले. आता २१ फेब्रूवारी रोजी वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई इलेक्ट्रिक संघर्ष समितीने प्रसारमाध्यमांना दिली.
युनियने पुकारलेला संप अघोषित आहे. यातून गैरसमज पसरविले जात आहेत. ग्राहकांचे समाधान हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. वीज पुरवठा अथवा ग्राहक सेवेत कोणतीही बाधा येणार नाही; आणि ग्राहकांना त्रास होणार नाही, असे आम्ही ग्राहकांना आश्वासित करत आहोत.