बेस्टच्या विद्युत विभागात आता कंत्राटी कामगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:18 AM2018-07-01T01:18:26+5:302018-07-01T01:18:43+5:30

आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बसगाड्या भाड्याने घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मजुरांची भरतीही कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे. बेस्ट प्रशासनाने विद्युत विभागात कंत्राटी कामगार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

 Contract workers now in best electric field | बेस्टच्या विद्युत विभागात आता कंत्राटी कामगार

बेस्टच्या विद्युत विभागात आता कंत्राटी कामगार

Next

मुंबई : आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बसगाड्या भाड्याने घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मजुरांची भरतीही कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे. बेस्ट प्रशासनाने विद्युत विभागात कंत्राटी कामगार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. मात्र खासगी बसगाड्या घेण्याचा निर्णय न्यायप्रविष्ठ असल्याने खासगी भरतीही अडचणीत येणार आहे.
मुंबई शहर हद्दीमध्ये विविध ठिकाणी उत्खनन करणे, तारखंड टाकण्याची कामे करणे आणि अन्य संबंधित तांत्रिक कामे पार पाडणे यासाठी बेस्टला कामगारांची गरज असते. यापूर्वी बेस्टमध्ये नवघाणी या पदावरील कर्मचारी ही कामे करीत होते. मात्र आता या पदावर कामगारांची भरती न करता ठेकेदारांकडून कंत्राटी पद्धतीने ही पदे भरली जाणार आहेत.
बेस्टने पाचशे कंत्राटी कामगारांसाठी सुपर सर्व्हिस पॉइंट व डी.एम. एंटरप्राइज या दोन ठेकेदारांना ही कामे देण्याचा निर्णय घेतला
आहे.
बेस्ट उपक्रमावर कर्जाचा डोंगर व दरवर्षीची तूट वाढत असल्याने कामगारांचा पगार देणेही अवघड झाले आहे. त्यामुळे आर्थिक शिस्तीसाठी कठोर निर्णय घेऊन बचत करण्याचे निर्देश पालक संस्था असलेल्या महापालिकेने बेस्ट उपक्रमाला दिले आहेत. त्यानुसार शंभर बसगाड्या भाड्याने घेण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता.
मात्र या खासगीकरणाला कामगार संघटनांनी न्यायालयात आव्हान दिल्याने खासगी भरतीचा प्रस्तावही बारगळण्याची शक्यता बेस्टमधील सूत्रांनी व्यक्त केली.

- बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागात या कामांसाठी नवघाणी कामगार असून त्यांचे वेतन दरमहा १९ हजार रुपये आहे. त्यानुसार दररोज एक हजार १४७ रुपये खर्च प्रति कामगार बेस्टला खर्च करावा लागतो.
- हंगामी कामगारांना सध्या बेस्ट उपक्रमाकडून दिवसाला ७०४ रुपये व बस पास दिला जातो. याप्रमाणे ७७४ रुपये खर्च बेस्ट उपक्रमास येतो.
- सुरक्षेची साधने व अवजारेदेखील या हंगामी कामगारांस पुरवावी लागतात. यासाठी आणखी ८५१ रुपये खर्च वाढतो. या खर्चात कपात करण्यासाठी तसेच विद्युत विभागात मोठ्या प्रमाणात हंगामी कामगारांची कमतरता असल्याने शहरात मोठ्या संख्येने विद्युत दोष आढळून येत असल्यानेच बेस्ट उपक्रमाने कंत्राटी पद्धतीने कामगार घेण्याचा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
- बेस्ट उपक्रम पाचशे मजुरांसाठी वार्षिक १८ कोटी ७० लाख ७५० रुपये खर्च करणार आहे. हा प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना बेस्ट समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

Web Title:  Contract workers now in best electric field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट