पालिका मोजणार सहा कोटी : प्रस्तावाला विरोध, पक्षाकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. मात्र नाल्यातून काढलेला गाळ सुकण्यासाठी ठेकेदार रस्त्यावरच ठेवत असतो. परिणामी हा गाळ पुन्हा नाल्यांत गेल्याने सफाईचे उद्दिष्ट साध्य होत नाही. त्यामुळे रस्त्यालगतच्या लहान नाल्यांमधून काढलेला गाळ गोळा करून वाहनांद्वारे भिवंडी परिसरातील खासगी जागेत टाकण्यासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिका ठेकेदाराला तब्बल सहा कोटी रुपये मोबदला देणार आहे. मात्र यावर्षी महापालिका आर्थिक संकटात असताना, या प्रस्तावाला पक्षाकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे.
पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून गाळ काढण्यात येतो. ही कामे विभाग कार्यालय स्तरावर करण्यात येतात; मात्र लहान नाल्यांमधील गाळ सुकण्यासाठी रस्त्यालगतच ठेवण्यात येत असल्याने हा गाळ बराच काळ पडून राहिल्यास रहदारीला अडथळा निर्माण होतो. तसेच, परिसरात अस्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो. यासाठी हा गाळ गोळा करून वाहनांद्वारे उचलून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र गेल्यावर्षी नियुक्त केलेल्या ठेकेदाराचा कालावधी संपुष्टात येत असल्याने ही सुविधा भाडेतत्त्वावर घेण्यात येत आहे. त्यासाठी पालिकेने निविदा मागविल्या होत्या.
* वाहनांवर प्रमुख अभियंत्यांची राहणार नजर
परिमंडळ १ -२ साठी ६८ लाख रुपये, परिमंडळ तीनसाठी एक कोटी १९ लाख रुपये, परिमंडळ -४ साठी ५५ लाख ८० हजार रुपये, परिमंडळ सहा - दोन कोटी ३१ लाख रुपये, परिमंडळ सात - एक कोटी पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत. परिमंडळ -५ मध्ये ठेकेदाराशी वाटाघाटी करून दर कमी करण्यात येणार आहे. हा ठेकेदार नाल्यातील गाळ वाहनांद्वारे भिवंडी येथील ओवळी या गावातील खासगी जागेत परवानगीने टाकणार आहे. हा गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांवर प्रमुख अभियंता (दक्षता) यांची देखरेख असणार आहे.