Join us

कंत्राटदारामुळे बोरीवलीचा एलटी रोड खड्ड्यांत

By admin | Published: July 28, 2016 3:12 AM

जून आणि जुलै महिना संपत आला, तरीदेखील मुंबई महापालिकेने शहर आणि उपनगरातील खड्डे बुजवलेले नाहीत. पश्चिम उपनगरातील रस्त्यांची तर खड्ड्यांमुळे चाळण झाली

- गौरी टेंबकर-कलगुटकर, मुंबई

जून आणि जुलै महिना संपत आला, तरीदेखील मुंबई महापालिकेने शहर आणि उपनगरातील खड्डे बुजवलेले नाहीत. पश्चिम उपनगरातील रस्त्यांची तर खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, याचा फटका वाहनचालकांसह नागरिकांना होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठवूनही महापालिका प्रशासन ढिम्म असल्याने खड्ड्यांचे साम्राज्य वाढतच आहे. पश्चिम उपनगरातील बोरीवली पश्चिमेकडील एलटी रोडची खड्ड्यांमुळे अशीच दुरवस्था झाली असून, महापालिकेने काहीच कार्यवाही केलेली नाही. परिणामी, स्थानिकांचा संताप अनावर झाला असून, या रोडप्रकरणी कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, असा आवाज उठवण्यात येत आहे.बोरीवली पश्चिमेकडील एलटी रोडची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. हा रस्ता कायम गजबजलेला असतानाही महापालिकेने रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलेला आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचत असून, येथील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे, पाच वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, प्रत्येक पावसाळ्यात या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते आहे. जेव्हा-जेव्हा खड्डे पडतात, तेव्हा-तेव्हा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केले जाते, असा दावा महापालिकेने केला. मात्र, रस्त्यावरील खड्डे भरणाऱ्या कंत्राटदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे. बोरीवलीकरांना रस्त्यावरील खड्ड्यांचा अतोनात त्रास होत असून, पावसाळ्यात येथे वारंवार अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. एकंदर महापालिकेने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला असला, तरी कंत्राटदारावरील कारवाईबाबत प्रशासन का टाळटाळ करत आहे? असा सवाल स्थानिकांनी केला आहे.आरोग्याचा खर्च महापालिका देणार का?पावसात खूपच त्रास होतो. एकदा तर खड्ड्यात पडून माझी मोटरसायकल उलटी झाली. हात मोडल्याने महिनाभर घरी होतो. माझ्या आरोग्यावर झालेला खर्च महापालिका किंवा कंत्राटदार देणार आहेत का?- सत्या शिराला, मोटरसायकल चालकरस्त्यावरील खड्डे भरताना एक ते दीड फूट वेट मिक्स टाकून नंतर ते बंद करणे गरजेचे आहे. मात्र, येथील कंत्राटदार कामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरत आहेत. त्यामुळे महिनाभरात रस्ता पुन्हा खड्ड्यात जातो आहे. लगतच्या महाविद्यालयातील विद्यार्थी या रस्त्याच्या मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास होत असून, या रस्त्याबाबत मी महापालिकेला एका महिन्यात तीन पत्र पाठविली आहेत. मात्र, एकाही पत्राचे उत्तर महापालिकेने दिले नाही.- शिवा शेट्टी, स्थानिक नगरसेवकमी दररोज या रस्त्याचा वापर करतो. आता खड्ड्यांमुळे पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे. पाठदुखीच्या त्रासामुळे पंधरा दिवस रुग्णालयात काढले आहेत. रिक्षाचालक असल्याने, त्रासात कायमच भर पडते आहे. असे झाले, तर घर चालवायचे कसे? हा प्रश्नच आहे की.- मोहम्मद इस्माईल, रिक्षाचालकमी बोरीवलीमध्येच राहतो. कामाच्या निमित्ताने एलटी रोडवरून ये-जा असते. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज कार बिघडते. एका आठवड्याचा पॉकेटमनीचा खर्च मला कारच्या दुरुस्तीवर करावा लागला आहे. हे नित्याचे झाले आहे. मात्र, पर्याय नाही. कारण महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. - रितेश सुर्वे, स्थानिक रहिवासीमी मालाडला राहतो. गोखले महाविद्यालयात शिकतो. त्यामुळे हा रस्ता माझा नेहमीचाच आहे. मात्र, पावसात या रस्त्यावरून प्रवास नकोसा होतो. रस्त्यावरील खड्ड्यामुळे माझ्या मित्राच्या पायाला दुखापत झाली आहे, शिवाय खड्ड्यातील पाण्याचाही त्रास होतो आहे. महापालिकेला खड्डे नीट भरता येत नसतील, तर किमान निकृष्ट दर्जाचे काम तरी करू नका आणि आम्ही शिकायचे की, खड्ड्यांची तक्रार करायची, हेदेखील पालिकेने आम्हाला सांगावे.- ओमकार घडशी, विद्यार्थी